महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता कुठेतरी दिलासा मिळताना दिसून येत आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील मान्सून हा कोकणामध्येच रखडलेला होता.
परंतु त्याला आता काहीशी गती मिळताना दिसून येत असून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मान्सूनचा प्रवेश झालेला आहे. त्यामुळे आता मान्सूनच्या दिलासादायक बातम्यांमुळे शेतकरी सुखावला असून शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
राज्यासह देशाचा पावसा संदर्भात पाहिले तर पुढील चार दिवस देशातील 20 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून यामध्ये मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, छत्तीसगड, उत्तराखंड, तेलंगणा, तसेच ईशान्यकडील मणिपूर, मिझोराम इत्यादी राज्यांचा समावेश आहे.
एवढेच नाही तर कोकण आणि गोवा व विदर्भ, आंध्र प्रदेशाचा किनारी भाग व किनारी कर्नाटक, आणि तामिळनाडू राज्यांमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
महाराष्ट्रासाठीचा हवामान अंदाज
विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यामध्ये शुक्रवारी मान्सूनचे आगमन झाले असून येणाऱ्या तीन दिवसांमध्ये संपूर्ण विदर्भ व राज्यातील बहुतेक भागांमध्ये मान्सून सक्रिय होईल अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्राच्या संचालक एम. एल.साहू यांनी दिली.
एवढेच नाही तर मध्य महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये शनिवारी मध्यम तर रविवारपासून जोरदार मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच मुंबई आणि ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा विचार केला तर या ठिकाणी देखील संपूर्ण आठवडाभर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये शनिवारी आणि रविवारी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे देखील हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.
मराठवाड्यामध्ये रविवारपासून जोरधार
राज्यातील नाशिक, अहमदनगर, पुणे आणि साताऱ्याचा पूर्व भाग, तसेच जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवस पावसाचे प्रमाण कमी राहील परंतु रविवार पासून या सर्व ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.