Maharashtra News : राज्यातील नांदेड, लातूर, धाराशीव, यवतमाळ आणि बारामती या विमानतळांचे सक्षमीकरण करून विमान सेवा सुरू होण्याच्या दृष्टीने हे पाचही विमानतळ खासगी कंपनीला भाडेपट्ट्याने चालवण्यास देण्यात आले होते.
मात्र गेल्या १४ वर्षांत या ठिकाणी विमान सेवा सुरू होऊ शकली नसल्याने त्यांचा ताबा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घ्यावा. यासाठीची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेल्या विमानतळांबाबत मंत्रालयात बैठक झाली.
या बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडेय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने नांदेड, लातूर, धाराशीव, यवतमाळ आणि बारामती या विमानतळांवर पायाभूत सुविधांची उभारणी सुरू केली होती. या प्रक्रियेला वेग देण्याच्या दृष्टीने आणि विमानतळांच्या सक्षमीकरणासह हवाई सेवा सुरू करण्यासाठी या पाच विमानतळांचे हस्तांतरण खासगी कंपनीकडे करण्यास वर्ष २००९ मध्ये परवानगी देण्यात आली होती.
परंतु आज त्यांची परिस्थिती दयनीय आहे. त्यामुळे हे पाचही विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आपल्या ताब्यात घ्यावेत, असे निर्देशही पवार यांनी दिले.