Maharashtra Mlc Election Results : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला आहे. याठिकाणी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी विजयाचा झेंडा फडकवला आहे. तर महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil)यांना पराभूत केले आहे.
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये सुरू असलेल्या मतमोजणीतील चौथ्या फेरीमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना 60 हजार 161 मते पडली. तर महाविकास आघाडी पुरस्कृत असलेल्या शुभांगी पाटील यांना 33,776 मते पडली आहेत. चौथ्या फेरी अखेर 1 लाख 12 हजार मतांची मोजणी पूर्ण झाली आहे.
या निवडणुकीत सत्यजित तांबे यांना 68 हजार 999 मते मिळाली. तर शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मते मिळाली. तांबे यांनी तब्बल 29 हजार 465 मताधिक्य मिळवून विजय मिळवला आहे.
दरम्यान, राज्यातील अमरावती आणि नाशिक पदवीधरसह नागपूर, औरंगाबाद आणि कोकण शिक्षक मतदारसंघापैकी चार मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले आहेत. यात नागपूर, औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीला विजय मिळाला आहे.
तर नाशिकमध्ये अपक्षाने बाजी मारली आहे. कोकणात मात्र भाजपने (bjp) विजय खेचून आणला आहे. तर अमरावतीत महाविकास आघाडीचा उमेदवार आघाडीवर आहे.
कोकणात भाजप
या पाचही मतदारसंघातील निवडणुकीचा सर्वात पहिला निकाल कोकण शिक्षक मतदारसंघाचा लागला. या निवडणुकीत भाजपचा विजय झाला, भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेकापचे बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे.
बाळाराम पवार हे विद्यमान आमदार होते. या निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20,800 मते मिळाली. तर शेकापचे बाळाराम पाटील यांना 9500 मते मिळाली. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी 11,300 मताधिक्य घेत आपला विजय नोंदवला आहे.
चौथ्यांदा विजयी होण्याचा ‘विक्रम’
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात चौथ्यांदा निवडून येण्याचा विक्रम महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांनी केला आहे. विक्रम काळे यांनी भाजपचे उमेदवार किरण पाटील यांचा पराभव केला.
या निवडणुकीत विक्रम काळे यांना 23 हजार 577 मिळाली. तर किरण पाटील यांना 16 हजार 663 मते मिळाली. विक्रम काळे यांनी तब्बल 6,914 मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे.
नागपूरमध्ये गाणार यांचा पराभव
नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम पीचवरच भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना तब्बल 16 हजार 700 मते मिळाली आहेत.
तर भाजप पुरस्कृत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांना केवळ 8 हजार 211 हजार मते मिळाली. विशेष म्हणजे नागो गाणार हे दोन टर्म आमदार होते. तरीही त्यांचा पराभव झाला. आडबोले यांनी 8,489 मतांचं मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे.
अमरावतीचा निकाल वेटिंगवर
अमरावती पदवीधर मतदारसंघाचा निकाल अद्याप यायचा बाकी आहे. भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांनी निवडणुकीत अवैध मते पडल्याने फेर मतमोजणीची मागणी केली होती. त्यामुळे फेर मतमोजणी सुरू झालेली आहे. म्हणून अमरावतीचा निकाल लांबला आहे.
मात्र, फेर मतमोजणीतही धीरज लिंगाडे आघाडीवर आहेत. लिंगाडे यांना 43 हजार 577 मते मिळाली आहेत. तर रणजित पाटील यांना केवळ 41 हजार 248 मते मिळाली आहेत. लिंगाडे हे 2366 मते घेऊन आघाडीवर आहेत.
दरम्यान, पराभवानंतर शुभांगी पाटील यांचा सत्यजित तांबेना टोला
‘मी पहिल्यांदा निवडणूकीत उभी राहिली होती, मला 35 हजार मतं पडली आहेत. त्यामुळे ही मतं विकली गेली नव्हती, असा शब्दात पाटील यांनी अप्रत्यक्षपणे तांबे यांच्यावर निशाणा साधला. तसेच हा विजय धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा झाला आहे, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे.