२२ जानेवारी २०२५ पुणे : एचएमपीव्ही व्हायरसच्या (विषाणू) धक्क्यातून सावरत असतानाच पुणे शहरात आता ‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’ या नव्या विषाणूचा शिरकाव झाला आहे.या विषाणूचे २४ संशयित रुग्ण शहरात आढळले असून या रुग्णांना गुईलेन बॅरे सिंड्रोमची बाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.त्यामुळे पुणेकरांची चिंता आणखीनच वाढली आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व पूना हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांमध्ये गुईलेन बॅरे सिंड्रोम या विषाणूची लक्षणे आढळून आली असून हे सर्व रुग्ण सिंहगड रस्ता परिसरातील आहेत. मात्र, योग्य उपचार घेतल्यावर रुग्ण ठणठणीत बरा होतो.त्यामुळे घाबरून जाऊ नये.फक्त काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवालानुसार, गुइलेन बरे सिंड्रोम हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे.यामध्ये शरीरातील रोगप्रतिकार शक्तीच मज्जातंतूवर हल्ला करू लागते.यामुळे स्नायूंमध्ये कमकुवतपणा येतो. स्नायू सुन्न पडतात. त्यात वेदनाही होतात. या आजारात कधी-कधी अर्धांगवायूचा झटका येण्याचीही शक्यता असते. या आजाराचा फैलाव वेगाने होत असला, तरी रुग्ण लवकर बरेदेखील होतात.
मात्र, रुग्णांना बरे होण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळा लागू शकतो. गुईलेन बॅरे सिंड्रोम विषाणूने पेरू देशात धुमाकूळ घातला आहे. तेथे आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. या रुग्णांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
विशेषतः १२ ते ३० या वयोगटातील लोकांना हा आजार होतो. हा आजार धोकादायक नाही. त्यामुळे काळजीचे कारण नाही. पुण्यात जे संशयित रुग्ण सापडले आहेत. त्या रुग्णांची संपूर्ण माहिती घेण्यात आली आहे. या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
मुख्य म्हणजे हा संसर्गजन्य आजार नाही. यासाठी वेगळी ट्रीटमेंट घ्यावी लागत नाही. नेहमीची जी ट्रीटमेंट असते. तीच ट्रीटमेंट पुरेशी आहे. तसेच आजार लवकर बरा होतो – डॉ. निना बोराडे, आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका
काय आहे विषाणू ?
■ गुईलेन बॅरे सिंड्रोम नसांवर परिणाम करणारा आजार. यात स्नायू कमकुवत होतात.
■ स्नायू कमकुवत झाल्याने वेदना होतात. संवेदना कमी होतात.
■ चेहरा, डोळे, छाती शरीरातील स्नायूंवर परिणाम होतो.
■ तात्पुरता अर्धांगवायू तसेच श्वसनासही त्रास होतो.
■ हाताची बोटं, पायांत वेदना होतात.
■ चालताना त्रास, चिडचिडही होते.
रुग्णालयांतील रुग्णसंख्या
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल – १०
सह्याद्री हॉस्पिटल – १
भारती हॉस्पिटल – ३
काशीबाई नवले हॉस्पिटल – ४
पूना हॉस्पिटल हॉस्पिटल – ५
अंकुरा हॉस्पिटल – १
एकूण – २४