राष्ट्रवादीच्या प्रदेशस्तरावरील काहीजणांशी व स्थानिक स्तरावर तत्कालीन जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्याशी न पटल्याने मागील जिल्हा परिषद निवडणुकीत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व त्यांचे चिरंजीव शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेऊन क्रांतिकारी शेतकरी पक्षाची स्वतंत्र चूल मांडली होती. त्यानंतर त्या परिसरातील बहुतांश निवडणुकांतून त्यांनी यश मिळविले.
या पार्श्वभूमीवर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बाळासाहेब मुरकुटेंविरोधात क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख उभे राहणार असल्याचे स्पष्ट झाल्य़ावर राष्ट्रवादीनेही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना उतरविण्याची तयारी सुरू केली होती.
पण अखेर ऐनवेळी लंघेंना थांबवून गडाखांना बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. तेथे गडाख-लंघेंतील मतविभागणीचा फायदा मुरकुटेंना होऊ नये म्हणून गडाखांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे पक्ष सूत्रांकडून सांगितले जात असले तरी अंतिम निवडणूक चित्रात नेवाशात राष्ट्रवादीच्या तिकिटावर उमेदवार नाही, असेच दिसत आहे.