‘गुन्हेगार उमेदवाराचे पार्सल परत पाठवा, व सुशिक्षित व अभ्यासू उमेदवाराला विधानसभेत पाठवा. रसातळाला गेलेले राज्य पूर्वपदावर आणण्यासाठी शरद पवार यांना ताकद द्यावी,’ असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी केले.
राष्ट्रवादी राहुरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी शुक्रवारी (४ ऑक्टोबर) रॅली काढून शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी संकल्प महाविजयाचा सभेत मिटकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके होते. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर या उपस्थित होत्या. मिटकरी म्हणाले, ‘बाहेरच्या आमदारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. देशाचे गृहमंत्री तडीपार होते.
त्यांच्या टोळीतील उमेदवाराला चारीमुंड्या चीत करा. विकासाच्या पोकळ गप्पा मारुन जनतेला झुलवित ठेवले. शिवस्मारकाच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करुन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. धनगर, मराठा समाजाला आरक्षणाच्या नावाखाली झुलवत ठेवले. चारशे कॅबिनेट झाल्या तरी धनगर समाजाला आरक्षण दिलेले नाही. शरद पवार यांचेवर चिखलफेख करुन मते मिळविण्याचा प्रयोग यशस्वी होणार नाही.