कोपरगाव मागील पाच वर्षांत नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुटले नाहीत. मतदारसंघाचा विकास फक्त फ्लेक्सवरच झालेला दिसत आहे. २००४ ला ३५ वर्षांची सत्ता उलथवून टाकून मतदारांनी इतिहास घडवला. यावेळीही त्याची पुनरावृत्ती होणार आहे, असे राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी कवाडे गट, शेकाप मित्रपक्षाच्या वतीने काळे यांनी शुक्रवारी आपला अर्ज दाखल केला. या वेळी ते बोलत होते. काळे म्हणाले, पाच वर्षांत तालुक्याची वाताहत झाली आहे. जनता आमदाराच्या कारभाराला कंटाळली आहे.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार नंबर साठवण तलावाचे विस्तारीकरण होऊ नये व नवीन पाच नंबर साठवण तलाव होऊ नये यासाठी आमदारांनी आपली राजकीय ताकद पणाला लावून नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवले. तो रोष मतदान यंत्रातून व्यक्त होणार आहे.