अकोले :- विधानसभेची निवडणूक हि विकासाची नांदी असून लोकांनीच ती हाती घेतली आहे. समोरच्या लोकांकडे निंदा,नालस्ती करणे व अपशब्द वापरणे हाच कार्यक्रम आहे. याला उत्तर मतदानातून द्या आणि बारामतीचे आक्रमण परतवून लावा, असे आवाहन माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी केले आहे.
भाजपा महायुतीचे उमेदवार वैभवराव पिचड यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अमित शहा यांचे सभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर येथे उतरू शकले नाही. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थित हि सभा पार पडली.
आयटीआय मैदानावर पार पडलेल्या या सभेला गृहनिर्माण मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, वैभवराव पिचड , खा.सदाशिव लोखंडे ,भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष सचिन तांबे ,जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम गायकर,अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुरराव नवले,शिवसेनेचे उत्तर नगरजिल्हा रावसाहेब खेवरे,जी.प.तील भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे ,
जेष्ठ नेते शिवाजी धुमाळ,माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे , वकील वसंत मनकर,भाजप तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे ,सेनेचे तालुका प्रमुख मच्िंछद्र धुमाळ , मीननाथ पांडे,सरपंच हेमलताताई पिचड ,सौ. पुनम पिचड ,भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष सोनाली नाईकवाडी उपस्थित होते.
श्री. पिचड पुढे म्हणाले कि,वयाची ८० वर्षे पूर्ण झाली. संपूर्ण आयुष्य लोकविकासाची कामे केली. आदिवासी विकासमंत्री असताना आदिवासींसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प केला. पेसा कायदा लागू केला. आदिवासींच्या संरक्षणासाठी सन २००० साली कायदा केला.
देश भरभक्कम करणाऱ्या माणसाच्या मागे उभा राहत असताना व सर्वसामान्य माणसासाठी विकासाचे काम करणाऱ्या लोकांच्या मागे जात असताना राष्ट्रउभारणीचे काम आपल्याला करायचे आहे. केंद्रातील मोदी सरकारने ओबिसी महामंडळ निर्माण केले.
ओबिसी आयोग स्थापना केला. मुस्लिमांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. असे देश व राज्य बांधणीचे काम होत असताना आपण मागे का रहायचे म्हणून आपण भाजपमध्ये प्रवेश केला.
सध्याची निवडणूक हि अत्यंत खालच्या पातळीवर गेली असून बारामतीचे काही लोक अकोल्यात आले आहेत. बारामतीचा हस्तक्षेप दिसू लागला आहे. बारामतीचे हे आक्रमण परतवून लावत विरोधकांना मतदानातून उत्तर द्या. १९९५ ची पुनरावृत्ती घडवून आणा.
वैभवच्या पाठीशी उभे राहा. मला हा विजय माझ्या डोळ्यांनी पाहू द्या. राष्ट्रवादीबद्दल अपशब्द वापरणारे आता नेते झालेत. त्यांचा बंदोबस्त अकोल्याची जनताच करील यात शंका नाही. या निवडणुकीला पूर्ण आत्मविश्वासाने सामोरे जात असून विजय निश्चित आहे. असेही पिचड म्हणाले.