महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेचे उमेदवार अक्षय कातोरे यांनी येथील न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे. प्रभाग सातमधील विजयी व पराभूत उमेदवार, निवडणूक प्रशासन अशा २६ जणांना न्यायालयाने नोटिसा काढल्या आहेत. या सर्वांना म्हणणे मांडण्यासाठी ११ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
अक्षय कातोरे यांचा ८४ मतांनी पराभव !
शिवसेनेचे अक्षय कातोरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कुमार वाकळे यांनी ८४ मतांनी पराभव केला आहे. निवडणुकीतील गैरप्रकारामुळे वाकळे विजयी झाल्याचा दावा कातोरे यांचा आहे. प्रभाग सातमधील साडेचारशे मतदान दुसऱ्या प्रभागातील आहे. बीएलओ यांनी नावे मुद्दाम घातली आहेत. प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यावर त्यावर कातोरे यांनी हरकती घेतल्या होत्या.
त्यामुळे मतदारांनी आमच्याविरोधात मतदान केले
या नावांबाबत बीएलओ पाहणी करण्यास गेले असताना त्यांना दमदाटी करून हाकलून दिले होते. त्यामुळे ही नावे अंतिम यादीत तशीच राहिली होती. त्यामुळे मतदारांनी आमच्याविरोधात मतदान केले. तसेच अडीचशे दुबार मतदारांचे बोगस मतदान झालेले आहे, असे निवडणूक याचिकेत कातोरे यांनी म्हटले आहे.
पराभूत उमेदवार, निवडणूक आयोग यांना नोटिसा
पुणे येथील वकील नितीन आपटे हे कातोरे यांच्या वतीने बाजू मांडत आहेत. त्यांना नगरमधील वकील अभिजित लहारे आणि हेमंत पाटील हे सहाय्य करित आहेत. न्यायालयाने प्रतिवादी असलेले विजय़ी उमेदवार, पराभूत उमेदवार, निवडणूक आयोग यांना नोटिसा काढल्या आहेत. महानगरपालिका निवडणूक झाल्यानंतर आतापर्यंत पाच पराभूत उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.