पाथर्डी : ‘निवडणूक प्रचारकाळात मी तुमच्या प्रचारासाठी नक्कीच सभा घेईल,’ असे आश्वासन राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार मोनिका राजळे यांना दिले.
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागताच काही राजळे विरोधकांनी पंकजा मुंडे यांची भेट घेत, राजळे यांना कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी देऊ नका, असे साकडे मुंडे यांना घेतले होते.
या विषयावर अनेक बैठका व मेळावे घेत राजळे हटाव असा नाराही देण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर मोनिका राजळे यांनीही पंकजा मुंडे यांची भेट घेत, आपली बाजू मुंडे यांच्यासमोर मांडली होती. मात्र, त्याचा कोणताही गाजावाजा राजळे यांनी केला नाही.
या पार्शवभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीत असलेल्या मुंडे कोणाच्या पारड्यात माप टाकतात, याविषयी तालुक्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. मंगळवारी राजळे यांची उमेदवारी जाहीर होताच, राजळे समर्थकांनी राजळे व पंकजा मुंडे यांच्या विजयाच्या घोषणा देत विजयोत्सव साजरा केला.