नेवाशात ‘जयहरी’ का ‘जय क्रांतिकारी’?

नेवासा – संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागलेल्या नेवासा विधानसभा मतदार संघात मतदानाचा वाढलेला टक्का नेमका कोणाला देणार धक्का? असा सवाल मतदार संघात उपस्थित केला जात असून उद्या नेवासा मतदार संघात ‘जयहरि’ का ‘जय क्रांतिकारी’ चा जयघोष होतो याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. 

नेवाशात दोन्ही उमेदवारांनी अटीतटीने निवडणूक लढवली. त्यामुळे गडाख – मुरकुटे समर्थकांकडून विजयाचा दावा केला जात असला तरी सर्वसामान्य मतदार मात्र कानावर हात ठेवत आहेत. सामान्य माणूस निकालाबाबत उघडपणे बोलत नसल्याने आजी माजी आमदारांच्या विजयासंदर्भात उत्सुकता ताणली जात आहे. नेवासे मतदार संघात वेगवेगळ्या चर्चा होत असताना निकाल मात्र नेहमीच वेगळा लागल्याचे चित्र समोर आले आहे. आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

दोन्ही गटांकडूनही ताकद लावली गेली. पावसाने उघडीप दिल्याने मतदान वाढले आहे. मतदार संघात १७ उमेदवार असले तरी आमदार बाळासाहेब मुरकुटे व माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यातच अटीतटीची लढत झाली आहे. दोन्ही गटांकडून निवडणुकीत रंगत आणण्यात आली. गडाख गटाने अनेक दिवसांपासून मतदार संघ पिंजून काढला आहे.

मुरकुटे यांनीही विकास दिंडीच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेचा संवाद साधला आहे. या मतदार संघात जिल्हयात सर्वाधिक ८० टक्के मतदान झाले आहे. २ लाख ६२ हजार ७७० पैकी २ लाख १० हजार ४१० मतदारांनी मतदानाचा हक बजावला आहे. हा वाढलेला मतदानाचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार आहे? कोणाला झटका देणार आहे? नवा मतदार कोणाच्या बाजुने गेलेला आहे? 
अशा वेगवेगळ्या चर्चा सध्या झडत आहेत.

चुरशीची लढत झाल्याने दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आपल्याच नेत्यांचा विजय होणार असल्याचे ठामपणे सांगत असला तरी सर्वसामान्य नागरिक मात्र निकालाविषयी स्पष्टपणे बोलत नाही. नको कोणाचाच उघडपणे विरोध म्हणून सामान्य जनता मूग गळून गप्प बसण्याची भूमिका घेत आहे. 

कार्यकर्ते एकमेकांमध्ये निकालाबाबत पैजा लावत आहेत. आपण कसे मतदान घडवून आणले त्या गावात त्याची हवा होती. या गावात हा लई चालला, हा आला तर असे होईल व तो आला तर तसे होईल, अशा वेगवेगळ्या गप्पांचा फड खेड्यापाड्यातील पारांवर रंगत असला तरी हाच निवडून येईल, 

असे छातीठोकपणे जनता सांगत नाही. गडाखांचा कार्यकर्ता जय क्रांतीकारी, तर मुरकुटेंचा कार्यकर्ता जरहरीचा नारा देताना दिसत आहे. खेड्यापाड्यातील महिला, नागरिक बोलत नसल्याने २४ तारखेच्या निकालाची उत्सुकता मोठ्या प्रमाणात ताणली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts