चुरशीच्या झालेल्या लढतीत राष्ट्रवादीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांनी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचा सलग दुसर्यांदा पराभव केला. विजय मिळवायचाच, या इर्षेने मैदानात उतरलेले आ. जगताप यांनी शिवसेना-भाजपची युती असतानाही विजय मिळविला.
भाजपची साथ नसणे आणि शिवसेनेतील नाराजी राठोड यांना भोवली. आ. जगताप यांना 81 हजार 217 आणि राठोड यांना 70 हजार 78 मते मिळाली. आ. जगताप 11 हजार 139 मतांनी विजयी झाले.
नगर शहरात एकदा आमदार झालेला पुन्हा होत नाही, हा इतिहास दुसऱ्यांदा पुसण्याचे भाग्य संग्राम जगताप यांना मिळाले. सलग दुसऱ्यांदा व तेही निर्विवाद बाजी मारीत त्यांनी शहराच्या आमदारकीत विजय मिळविला. ‘संग्राम वन्समोअर’ ही त्यांच्या प्रचाराची टॅगलाइन प्रत्यक्षात आली.
आ. जगताप मतमोजणी केंद्रात आल्यानंतर जोरदार पावसास सुरूवात झाली. मात्र पावसाची तमा न बाळगता समर्थक कार्यकर्ते गुलाल उधळून आणि आ. जगताप यांना खांद्यावर घेऊन नाचत होते.
सायंकाळी उशीरापर्यंत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि आ. जगताप समर्थकांचा जल्लोष शहरात सुरू होता. राठोड यांच्या पराभवामुळे शिवसेना मात्र नॉटरिचेबल झाली.