Maharashtra News : गेल्या ५३ वर्षांपासून वाट पाहात असलेल्या निळवंडेच्या लाभधारक शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता पडू देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन टीएमसी पाणी मागितले होते, तात्काळ त्यांनी रात्री साडेअकरा वाजता जलसंपदा विभागाच्या सचिवांना फोन करून पाणी वाढवण्याच्या सूचना दिल्या.
आता प्रत्येक गावात पूर्ण क्षमतेने तसेच विनावादाचे पाणी मिळण्यासाठी अधिकारी व शेतकरी यांच्या बैठका लावण्यात येणार असून लाभक्षेत्राला पाणी दिले जाणार असल्याचे प्रतिपादन खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले.
शुक्रवारी निळवंडे डाव्या कालव्याचे लाभार्थी शेतकरी व जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी शिर्डी विश्रामगृह येथे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त खासदार लोखंडे यांच्या हस्ते अनेक शेतकऱ्यांनी विनम्र अभिवादन केले. खासदार लोखंडे म्हणाले, मुंबई येथे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी अनेक वेळा वाट पाहावी लागली;
परंतु शेवटी भेट घेण्यात आली व तात्काळ कार्यवाही सुरू झाली.निळवंडेच्या पहिल्या चाचणीत काही शेतकऱ्यांना पाणी मिळाले, तर काही गावे वंचित राहिली होती.
दुसरी चाचणी सुरू झाली, परंतु प्रत्येक गावाला पाणी मिळाले नाही, त्यामुळे आता पाण्याची क्षमता वाढवण्यात आली असून आता प्रत्येक गावाला पाणी मिळणार आहे, परंतु वादविवाद न करता आता प्रत्येकाला पाण्याचा वाटा मिळण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. त्यामुळे गावातील तलाव, बंधारे, ओढे तसेच शेततलाव तुडुंब भरू दिले जाणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी चिंता करू नये.
यावेळी जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे, बाजीराव दराडे, निळवंडे समीतीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, उत्तम घोरपडे, विठ्ठल घोरपडे, राजू सोनवणे सदाशिव गोंदकर, प्रकाश चित्ते यांच्यासह शेतकरी उपस्थित होते..
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निळवंडेचा प्रश्न सुटला असून दीड टीमसी पाणी सोडले जाणार आहे. आता निळवंडेनंतर दुसरा संघर्ष घाटमाथ्याचे पाणी वळविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. येथे माझी जागा सध्या आरक्षित असली, तरी तुमची शेती कायमची आहे. त्यामुळे या भागाला पाणी कधी कमी पडू दिले जाणार नाही. – खा. सदाशिव लोखंडे