Maratha Reservation : तब्बल ७० वर्षांत सर्वपक्षीय नेत्यांना मराठा समाजाने मोठे केले. त्यांची मान कधीही खाली जाऊ दिली नाही. असे असताना मराठा आरक्षणाला विरोध का? असा सवाल मनोज जरांगे-पाटील यांनी येवला येथील सभेत उपस्थित केला.
मराठा आणि कुणबी एकच आहेत. आम्हाला आमचे आरक्षण द्या, तुमचे तुम्हाला ठेवा. इतर कोणाचाही वाटा आम्ही मागत नाही, गरीब मराठा समाजाला त्यांचे हक्काचे व टिकणारे आरक्षण हवे आहे, अशी भूमिका जरांगे-पाटील यांनी भुजबळ यांचे नाव न घेता मांडली.
जरांगे-पाटील यांचे सोमवारी येवल्यात आगमन होताच १४ जेसीबींच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. शहरातील विंचूर चौफुली ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत जरांगे-पाटील यांची मिरवणूक काढण्यात आली.
सकल मराठा समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. जरांगे पाटील म्हणाले, टिकणारे आरक्षण हवे तर एक महिन्याचा कालावधी द्या, असे राज्य शासन आम्हास वारंवार सांगत होते. खरे तर मंत्रिमंडळ एक ठराव करूनदेखील आरक्षण देऊ शकत होते.
मात्र, सरकारने दिलेले आरक्षण टिकले नाही, तर महिन्याचा कालावधी दिला नाही, असा ठपका ठेवला गेला असता. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी एक महिन्याचा कालावधी देण्याचा ठराव करावा, तशी विनंती सर्वपक्षीय नेत्यांनी केल्यावर आम्ही ३०, नव्हे तर ४० दिवसांचा कालावधी दिला आहे.
यापुढे आरक्षणासाठी मराठा समाजाच्या कोणत्याही मुलाला आत्महत्या करावी लागणार नाही. आंदोलन आमचे, मागणी आमची, अभ्यास आमचा, आरक्षणदेखील आमचे आणि ते आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
सोमवारी येवल्यात आगमन होताच त्यांनी तहसील कार्यालय आवारात मराठा आरक्षणप्रश्नी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला.
येत्या १४ तारखेला अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला असून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.