माजी आ.अनिल राठोड यांना हद्दपारीची नोटीस

अहमदनगर :- दोन वर्षांसाठी आपणास जिल्ह्यातून हद्दपार का करू नये,’ अशी विचारणा करणारी नोटीस माजी आमदार अनिल राठोड यांना उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी बजावली.

उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे माजी आमदार अनिल राठोड यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून हा अहवाल शहर विभागाचे पोलिस उपाधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता.

उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाकडून चौकशी झाल्यानंतर पुन्हा एकदा हा प्रस्ताव पोलीस विभागाच्या टिप्पणीसह उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला.

या प्रस्तावाच्या अनुषंगाने आपले म्हणणे सादर करण्याची नोटीस राठोड यांना काढण्यात आली आहे. नगर जिल्हा तसेच सीमेवर असणारे बीड, पुणे, नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यातून दोन वर्षांकरता हद्दपार का करू नये, अशी विचारणा करण्यात आली आहे.

निश्चित केलेल्या तारखेस म्हणणे सादर न केल्यास प्राथमिक चौकशी अंती प्राप्त अहवालानुसार नियमानुसार कारवाई केली जाईल, असेही या नोटिसीत म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
Tags: Anil Rathod

Recent Posts