Maharashtra News : दौंड-मनमाड रेल्वेमार्ग पुणे रेल्वे विभागात समावेश झाल्याने पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे सुरू करण्याबाबत नियोजन करावे, अशी अपेक्षा संघटनेच्या बैठकीत करण्यात आली. येथील प्रवासी संघटनेच्या कार्यकारी मंडळाची व सल्लागार मंडळाची येथील प्रवासी भवनमध्ये बैठक नुकतीच झाली.
यावेळी अध्यक्ष रणजीत श्रीगोड अध्यक्षस्थानी होते. सचिव योगगुरू अनिल कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. पुणे-दौंड रेल्वे मार्ग हा पूर्वी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात कार्यरत होता.
हा विभाग नांदेड किंवा पुणे विभागात घेणे संदर्भात गेली १० वर्ष प्रशासनात चर्चा सुरू होती. सोलापूर रेल्वे विभागाची कार्यक्षेत्र हे मोठे होते. त्यादृष्टीने पुणे रेल्वे विभाग छोटा होता. अखेर प्रशासनाने कामकाज गतीमान होण्याच्या दृष्टीने १ एप्रिलपासून हा रेल्वे मार्ग पुणे विभागात जाणार आहे.
सोलापूर रेल्वे विभागाने दिलेले सहकार्याबद्दल कौतुक करण्यात आले. या बैठकीत या मार्गावरील प्रवाशांचा पुणे शहराबरोबर मोठा दैनंदिन संबंध लक्षात घेवून मनमाड, शिर्डीहून जादा रेल्वे सुरू करून राहुरी, बेलापूर, पुणतांबा, श्रीगोंदा या स्टेशनचा सवलती द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
पुणे-अयोध्या हि साप्ताहिक रेल्वे सुरू करण्याची सूचना रेल्वे बोर्डाला करण्यात येणार आहे. प्रवासी संघटेच्या या बैठकीत उपाध्यक्ष डॉ. गोरख बारहाते, दत्तात्रय काशिद, कर्डीले, भाऊसाहेब शिंदे, वैभव गायकवाड, चंद्रभान ताथेड, किरण घोलप, जयकिसन तलरेजा, रवींद्र शहाणे यांनी सहभाग घेतला होता.
संघटनेच्या हितचिंतक व समता पतसंस्थेच्या लेखनीक पुनम शिरसाठ यांना राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने श्रीमती सहकार सम्राज्ञी २०२४ या स्पर्धेत तिसरे बक्षीस मिळाल्याबद्दल त्यांचा अनिता आहेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.