महाराष्ट्र

Navi Mumbai News : आता नवी मुंबईत धावणार मेट्रो निओ

Navi Mumbai News : नवी मुंबईत मेट्रो रेल, बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम आणि एक हायब्रिड मेट्रो निओ उभारण्याचे सध्या सिडकोच्या विचाराधीन आहे. असे झाल्यास भारतातील पाचवे व महाराष्ट्रातील तिसरे स्मार्ट शहर अशी नवी मुंबईची ओळख ठरण्याची शक्यता आहे.

यापूर्वी भारतातील नागपूर नाशिक, वारंगळ, दिल्ली, जयपूर या शहरांमध्ये तिनही सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मेट्रोच्या वाहतुकीतील संरेखनातील बदल वगळता मेट्रो रेलमधील सर्व वैशिष्ट्ये मेट्रो निओमध्ये असणार आहेत. रेल्वे आधारित डब्यांऐवजी उन्नत मेट्रोच्या ऊर्जावहनासाठी ओव्हरहेड उपकरणांसह द्वि आर्टिक्यूलेट बसेस असणार आहेत.

ज्याचे स्वरूप पूर्वी रस्त्यावरून धावणाऱ्या ट्रामसारखे असणार आहे. नवी मुंबईत मेट्रो निओ प्रस्तावित करण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे मेट्रो रेल्वेपेक्षा येणारा कमी खर्च. नवी मुंबईतील वाढते शहरीकरण लक्षात घेता मेट्रो निओ प्रस्तावित करण्यात आली आहे. नवी मुंबईतील प्रस्तावित मेट्रो निओ रहदारीची क्षमता ८ हजारांपर्यंत असून ती वाढविणे शक्य होणार आहे.

लवकरच सुरू होणार निविदा प्रक्रिया

नोव्हेंबर २०२० मध्ये केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने मेट्रो निओसाठी मानक तपशील जारी केले होते. सिडको महामंडळाने नवी मुंबई मेट्रो २, ३ आणि ४ च्या अंमलबजावणीला स्टॅण्डर्ड मानांकनानुसार मेट्रोऐवजी मेट्रो निओ २० या सुधारित परिवहन पद्धातीला मान्यता दिली आहे.

या ओव्हरहेड ट्रॅक्शन सिस्टिमच्या इलेक्ट्रिक ट्रॉली बससाठी मेट्रो स्थानके उभारण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सध्या सिडकोने अर्बन मास ट्रान्झिट कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या कंपनीने अधिक मागणीचा आराखडा तसेच स्थानकांची नावे सादर केली असून सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला आहे. येत्या काही महिन्यात निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts