Maharashtra News : महाराष्ट्रातील दुभत्या जनावरांची संख्या व दूध उत्पादन यांत तफावत आहे. दूधभेसळीचे अनेक प्रकारही समोर येत आहेत. त्यामुळे दुधातील भेसळ रोखण्यासाठी राज्यभरातील दुभत्या जनावरांना टॅगिंग करण्यात येणार आहे.
त्यामुळे भेसळीवर नियंत्रण येईल असे मत खा.डॉ.सुजय विखे यांनी व्यक्त केले. पत्रकार दिनाचे औचित्य साधत खा. सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या या नवीन निर्णयाची माहिती दिली.
खा. विखे म्हणाले, राज्यात अतिशय मोठ्या प्रमाणात दूधभेसळ होते. त्यामुळे दुधाचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी दुधाचे दर घसरले आहेत. दर घसरल्याने अनेक दूध उत्पादक शेतकरी नाराज झाले होते. खरेदी दर वाढविणे शक्य नसल्याने
आता शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचे ठरवले आहे. हे अनुदान जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांसाठी देण्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.
सुरुवातीला फक्त सरकारी सहकारी दूध संस्थांना दूध घालणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनाच हे अनुदान देण्यात येणार होते. मात्र, त्यातील त्रुटी लक्षात आल्यानंतर सरसकट अनुदान देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
भेसळखोरांचे रॅकेट उद्धवस्त करण्यासाठी टॅगिंग
भेसळ करणारे लोक दुधात भेसळीसाठी युरिया, तूप, दुधाची पावडर आदी रासायनिक पदार्थाचा वापर करत आहे. भेसळखोरांचे रॅकेट उद्धवस्त करण्यासाठी टॅगिंग सिस्टीम वापरली जाणार आहे. टॅगिंग केल्याने साधारणपणे एक जनावर किती दूध देते, याचा अंदाज येईल.
त्यामुळे भेसळीवर निर्बंध येतील. राज्यातील भेसळखोरांचे रॅकेट संपवण्यासाठी ही टॅंगिंग मोहिम पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरू केली असल्याची माहिती खा. विखे यांनी दिली.
प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र पथक
दुधातील भेसळ रोखणे हे अतिशय कठीण काम आहे. त्यामुळे सरकारने नवीन उपाय शोधला आहे. त्यासाठी दुभत्या जनावरांचे टॅगिंग केले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र भेसळविरोधी तपासणी पथक तयार करण्यात आले आहे. अशी पथके ही गावोगावी तपासणी करणार आहेत.