Good News : रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. सामान्य श्रेणीतील प्रवाशांची खाण्यापिण्याची चिंता दूर करण्यासाठी रेल्वेने स्थानकांवर माफक दरात खाण्यापिण्याचे स्टॉल लावण्याचे निर्देश दिले आहेत.
या स्टॉलवर प्रवाशांना २० रुपयांमध्ये पुरी-भाजी आणि ३ रुपयांमध्ये २०० मिली पाणी मिळेल. रेल्वेने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. रेल्वेस्थानकांवर गाडी थांबल्यानंतर ज्या ठिकाणी जनरल डबे येतात, अशा ठिकाणी माफक दरातील अन्नपदार्थांचे हे स्टॉल लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आदेशानुसार, या स्टॉलवर दोन प्रकारांत अन्नपदार्थ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पहिल्या प्रकारात २० रुपयांमध्ये सात पुरा , बटाट्याची भाजी व दिले जाईल. दुसर्या प्रकारचे अन्नपदार्थांसाठी ५० रुपये दर निश्चित केला आहे.
यामध्ये भात, राजमा, छोले-भट्रे, खिचडी-कुलचे, पाव-भाजी आणि मसाला डोसा असे खाद्यपदार्थ दिले जातील. या स्टॉलवर पिण्याचे पाणीदेखील सवलतीच्या दरात उपलब्ध असेल. पाण्याचा २०० मिली सीलबंद ग्लास अवघ्या ३ रुपयांमध्ये दिला जाईल.
आयआरसीटीसीच्या कँटीनद्वारे या अन्नपदार्थांचा पुरवठा केला जाईल. प्लॅटफॉर्मवर या स्टॉलची तरतूद सहा महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली आहे. सद्यस्थितीत देशातील ५१ स्थानकांवर अशा प्रकारचे स्टॉल सुरू असून गुरुवारपासून आणखी १३ स्थानकांवर ही सेवा दिली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.