महाराष्ट्र

आता जातीवाचक आडनावं बदलण्यासाठी मोहीम

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022 Maharashtra news :- राज्यातील काही गावं व वाड्यांची नावं जातीवाचक आहेत. त्यामुळं त्या गावातील ग्रामस्थांची कुचंबणा होतेच, शिवाय जातीयवादाला चालना मिळते.

त्यामुळं अशा गावांची नावं बदलण्याची योजना राज्य सरकारनं आणली आहे. मात्र, अशीच जातीवाचक आडनावंही आपल्याकडे आहेत.

आता ती बदलण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद या संघटनांच्या वतीनं ‘ऑपरेशन सरनेम सर्जरी’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी सांगितलं, ‘अनेक आडनावे अशी आहेत की, त्यावरून त्या व्यक्तीची जात समजते. त्यावरून अनेकांचे सामाजिक अवमूल्यन होतं.

त्यामुळं ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या आडनावामुळं जात स्पष्ट होते व मानवी सामाजिक अवमूल्यन होतं. अशी सर्व आडनावं कायद्यानं बदलण्याचा अधिकार व्यक्तीला आहे.

एक चळवळीद्वारे अशी आडनावं सोयीस्कररितीनं बदलता येणार आहेत. त्यासाठी एकाच वेळेला सरकारी गॅझेटमध्ये प्रसिद्धी, रेशन कार्डावर आडनाव नोंदीचा बदल, जातीच्या दाखल्यावर आडनाव बदल अशा सर्व गोष्टी कायद्यानं करता येणार आहेत,’ असेही अ‍ॅड.गवळी यांनी सांगितलं.

या मोहिमेसाठी अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, हिराबाई ग्यानप्पा, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, नाना डोंगरे, जालिंदर बोरुडे, विजय भालसिंग, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts