Pune News : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान यंदा डीजे आणि लेझर लाईट्सचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. या लेझर लाईटमुळे पुण्यातील जनता वसाहत परिसरात राहणाऱ्या एका तरुणाच्या डोळ्याच्या रेटिनाला गंभीर इजा होऊन त्याला काही अंशी अंधत्व आले आहे, अशी माहिती पुण्यातील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दुधभाते यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषद दिली.
अनिकेत (२३, रा. जनता वसाहत, पुणे) असे दृष्टी अधू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनिकेत मिरवणुकीच्या दिवशी पुण्यातील पर्वती पायथा परिसरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागीझाला होता. नाचत असताना डिजेवरील हिरवा लेझर लाईट त्याच्या एका डोळ्यावर पडला.
यावेळी त्याला डोळ्याला काही वेदना किंवा आग झाली नाही. परंतु, त्याची दृष्टी मात्र अंधुक झाली. एका डोळ्याची दृष्टी जवळपास ३० टक्क्यांनी कमी झाल्याचे अनिकेतने सांगितले. यानंतर सिंहगड रस्त्यावरील दुधभाते नेत्रालयात नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दुधभाते यांनी त्याच्यावर उपचार केले.
काय आहे लेझर बर्न ?
हिरव्या लेझर लाईटची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते. जे युवक त्या लेझर फ्रिक्वेन्सीच्या ‘फोकल लेंग्थ ‘ वर आले किंवा त्यांच्या नेत्रपटलावर आले तर त्यांना अशा त्रासाला सामोरे जावे लागते. आपण लहानपणी भिंग घेऊन ज्या प्रमाणे उन्हात कागद पेटवायचो तसाच प्रकार या लेझरने या तरुणाईवर केला आहे.
अनिकेतच्या डोळ्यावर लेझर लाईट पडल्याने त्याच्या नेत्रपटलावरील रेटिना बर्न झाले आहे. आता त्याच्यावर उपचार सुरू असून तो बरा होत आहे. तसेच अनिकेतसारखे अनेक रुग्ण असतील तर त्यांनी तातडीने नेत्ररोग तज्ज्ञाला दाखवावे.
हा लेझर लाईट टाळावा. या लेझर वापरावर बंदी आणण्याची गरज आहे. नाहीतर याचे भयंकर परिणाम पुढील नवरात्र आणि दिवाळीतही दिसतील आणि कित्येक निष्पाप लोकांची नजर यात जाईल.