Onion News : नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद ठेवले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादा भुसे यांची व्यापारी आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली.
मात्र व्यापाऱ्यांच्या मागण्या राज्य व केंद्र पातळीवरील असल्याने या बैठकीत ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे बैठकीची पहिली फेरी निष्फळ ठरली असून कांदा कोंडी कायम आहे.
व्यापारी कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याच्या मुद्दयावर ठाम असून, शुक्रवारी दुपारी ३ वाजता येवल्यात व्यापाऱ्यांची पुन्हा बैठक होणार आहे. यामध्ये आंदोलनाबाबत पुढचा निर्णय घेतला जाईल, तर व्यापारी आणि शेतकरी संघटना प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक मंगळवारी राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे होणार आहे.
केंद्र सरकारने नाफेड व एनसीसीएफकडून खरेदी केलेला कांदा देशांतर्गत घाऊक बाजारात कमी दरात विकला जात आहे. त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसत असून, त्यांनी जादा दराने खरेदी केलेला कांदा नाफेडच्या दरात विकावा लागत आहे.
त्यामुळे व्यापार करणे परवडत नसल्याची तक्रार करत बुधवारपासून जिल्ह्यातील एक हजारहून अधिक व्यापारी लिलावातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे लासलगाव, पिंपळगाव या मुख्य बाजार समित्यांसह सर्व बाजार समित्यांमधील कांदा लिलाव ठप्प आहेत.
यावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादा भुसे यांची व्यापारी आणि विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांचे आवाहन, व्यापारी ठाम
याप्रसंगी कोणत्या शेतकऱ्यांकडून किती कांदा खरेदी केला, याची माहिती तासाभरात जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करा, तसेच रोजच्या व्यवहारांची माहिती देणे गरजेचे असल्याचे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी नाफेड आणि एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांना दिले.
तर पणनमंत्र्यांसमवेतच्या बैठकीत व्यापाऱ्यांनी आपली बाजू मांडावी. तोपर्यंत लिलाव सुरू करावेत, असे आवाहन भुसे यांनी व्यापाऱ्यांना केले. परंतु तूर्तास लिलावात सहभागी न होण्याच्या भूमिकेवर व्यापारी ठाम आहेत.
अन्य जिल्ह्यांतील व्यापारी नाशकात येणार
बाजार समिती कायद्यानुसार, व्यापारी वा अन्य घटक संपावर गेल्यास कृषीमालाच्या खरेदी-विक्रीसाठी पर्यायी व्यवस्था उभारता येते. त्याआधारे बाजार समित्यांनी कांदा व्यापारासाठी इच्छुकांना नवीन परवाने द्यावेत; तसेच तात्पुरते परवाने देऊन ही व्यवस्था सुरळीत करण्याची सूचना केली आहे.
सहकार विभागाने सर्व बाजार समित्यांना ही सूचना केल्याचे जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी यांनी सांगितले. नगर व अन्य जिल्ह्यांतील व्यापारी जिल्ह्यातील बाजार समितीत कांदा लिलावात सहभागी होण्यास उत्सुक आहेत.