Maharashtra News : एसटी महामंडळात कार्यरत चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई व तत्सम संवर्गातील कर्मचाऱ्यांना लिपिक-टंकलेखक होण्यासाठी कर्मचारी वर्ग खाते परिपत्रक क्र. २८ नुसार पदोन्नतीसाठी प्रशासनाने लगतच्या तीन वर्षांत प्रत्येक वर्षी २४० दिवस उपस्थितीची अट घातलेली होती.
मात्र कोरोना व लॉकडाऊन काळात ही अट पूर्ण करणे कर्मचाऱ्यांना जिकिरीचे जात होते. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची पदोन्नती रखडली. सध्या सर्व स्थिरस्थावर असल्याने टाळेबंदी काळातील आव्हानात्मक दिवसही या अटींमध्ये धरण्यात यावे,
अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेकडून करण्यात येत होती. अखेर या मागणीला एसटी महामंडळाकडून हिरवा कंदील देण्यात आला असून यामुळे कर्मचाऱ्यांचा लिपिक-टंकलेखक बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एसटी महामंडळात चालक, वाहक, सहाय्यक तसेच शिपाई व तत्सम संवर्गातील बहुतांशी कर्मचारी महामंडळाच्या सेवेत रुजू होऊन एकाच पदावर सुमारे ३० ते ३५ वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त होतात. त्यांना वरिष्ठ संवर्गात पदोन्नतीची संधी मिळत नाही. अशा कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध होत नाही.
यासाठीच संचालक मंडळाने ठराव क्र. २०१८ : १२:१९ दि. ३१.१२.२०१८ अन्वये पारित केला आहे. याद्वारे चालक, वाहक, सहाय्यक तसेच शिपाई व तत्सम संवर्गातील कर्मचाऱ्यांना लिपिक-टंकलेखक संवर्गामध्ये पदोन्नती देण्याबाबत संचालक मंडळाने मान्यता दिलेली आहे. या ठरावानुसार यापुढे लिपिक-टंकलेखक संवर्गामध्ये ७५ टक्के पदे सरळसेवेने व २५ टक्के पदे पदोन्नतीने भरावयाची मान्यता दिली आहे.
मात्र मधल्या काळात २०२० मध्ये आलेल्या कोरोना सारख्या वैश्विक संकटामुळे या ठरावातील २४० दिवस उपस्थितीची अट कर्मचाऱ्यांसाठी अडचण ठरत होती. या अटीमुळे कर्मचाऱ्यांचे २०२० आणि २०२१ या दोन वर्षांतील दिवस पूर्ण होत नव्हते.
ही अट शिथिल करत कोरोना काळातील २२३ दिवसांची नोंदही पदोन्नतीसाठी विचारात घेतल्या जाणाऱ्या २४० दिवसांत ग्राह्य धरण्यात यावी, याबाबत महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेकडून वारंवार एसटी महामंडळाकडे तसेच शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता.
अखेर महामंडळाने याबाबत मान्यता दिली असून कोरोना काळातील २२३ दिवसही ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना यापुढे वर्षानुवर्षे एकाच पदावर काम करावे लागणार नसून बहुतांश कर्मचाऱ्यांचा लिपिक- टंकलेखक होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.