- Homepage
- महाराष्ट्र
- शेतक-यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा
शेतक-यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा
शेतक-यांच्या शेती उत्पादनात वाढ होऊन त्यांना शाश्वत आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासोबतच जे विकते ते पिकवायला शिकविण्यासाठी राज्यातील कृषी विद्यापिठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वित्त व नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाला 151 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे मागोवा 2018 या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वित्त व नियोजन आणि वनमंत्री श्री मुनगंटीवार बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. के पी विश्वनाथा उपस्थित होते. यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार प्रकाश गजभीये, डॉ. भास्कर पाटील, नाथा चौगुले, सुनिता पाटील, अशोक फरांदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे, डॉ. शरद गडाख आदि उपस्थित होते.
शेती व्यवसाय किफायतशीर करण्यासाठी कृषी विद्यापीठाचे संशोधन महत्वाचे ठरणार
राज्यासह संपूर्ण देशात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे महत्व मोठे आहे. विद्यापीठाला आवश्यक असलेल्या भौतिक सोईसुविधासोबतच शेतक-यांसाठी आवश्यक असलेल्या संशोधनाच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. देशात कृषीक्षेत्र महत्वाचे आहे. कृषीक्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. शेती व्यवसाय किफायतशीर करण्यासाठी कृषी विद्यापीठाचे संशोधन महत्वाचे ठरणार आहे. बाजारपेठेत जे विकू शकते ते पिकविणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठांनी शेतक-यांना विक्रीकौशल्याबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे सांगून पाच एकर ते शंभर एकर हा यशस्वी शेतक-याचा प्रवासही त्यांनी सांगितला.