Pune Ring Road Update:- पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून संयुक्तरीत्या रिंग रोड करिता प्रयत्न केले जात असून याचाच भाग म्हणून एमएसआरडीसी कडून रिंग रोड केला जात आहे.
एवढेच नाहीतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण देखील रिंग रोड विकसित करत असून हे दोन्ही रिंग रोड वेगवेगळे असणार आहेत. म्हणजेच पीएमआरडीएच्या रिंग रोड मधील काही भाग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे. यामध्ये मावळ तालुक्यातील परंदवाडी ते खेड तालुक्यातील सोलु या दरम्यानचा पीएमआरडीए 40 किलोमीटरचा रिंग रोड राज्य रस्ते विकास महामंडळ विकसित करणार आहे
तर उर्वरित ८८ किलोमीटर लांबीचा आणि 65 मीटर रुंदीचा रिंग रोड पीएमआरडीएकडून विकसित केला जाणार आहे. यासोबतच पुणे रिंग रोड साठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेला देखील आता गती देण्याचे काम प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आले आहे व त्यासंबंधीचीच अपडेट आपण या लेखात बघणार आहोत.
या तीन गावातील भूसंपादनाला पहिल्या टप्प्यात सुरुवात
दरम्यान आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या रिंग रोड प्रकल्पाच्या भूसंपादनाला सुरुवात करण्यात आली असून याकरिता पहिल्या टप्प्यात सोलू, निरगुडी आणि वडगाव शिंदे या तीन गावातील जमिनीचे संपादन करण्याकरिता मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे व या तीन गावातून 28 हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे.
एमएसआरडीसी अर्थात राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रिंग रोड प्रकल्पामुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत रिंग रोडची रुंदी 110 मीटर वरून 65 मीटर करण्यात आली आहे. या संपूर्ण रिंग रोड करता 750 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे व या संपूर्ण प्रकल्पाकरिता नगररचना योजनेतून तसेच अन्य प्रकल्पामधून जमीन उपलब्ध होणार आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये तीन गावातील भूसंपादन करण्यात येणार असून त्यामध्ये सोलु गावातील 13.17 हेक्टर, निरगुडी गावातील 9.32 हेक्टर आणि वडगाव शिंदे येथील 5.71 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन करण्यात येणार आहे. जेव्हा टप्पा पूर्ण होईल तेव्हा तो महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या परंदवाडी ते सोलु या रिंग रोडच्या टप्प्याला जोडण्यात येणार आहे.
त्यामुळे अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक हीच आळंदी किंवा सोलु या ठिकाणहून एक्सप्रेसवे वरून मुंबईकडे वळवता येणार आहे. तसेच पीएमआरडीए चा जो काही रिंग रोड आहे तो 83 किलोमीटरचा असून त्याच्याकरिता खेड, हवेली,मुळशी आणि मावळ तालुक्यातील 45 गावांमधील ७२० हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 4.8 किलोमीटरचा सोलु ते वडगाव शिंदे या रस्त्याचे काम पूर्ण केले जाणार आहे.