Pune Road News:- पुणे शहर हे झपाट्याने विकसित झालेले शहर असून आयटी आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये लगतच्या काही गावांचा समावेश करण्यात आल्यामुळे शहराची हद्द देखील वाढल्यामुळे महानगरपालिका आता राज्यातील पहिली क्रमांकाची महानगरपालिका आहे.
सहाजिकच पुणे शहराचा होणारा झपाट्याने विकास आणि शहराची वाढलेली हद्द इत्यादी बाबी डोळ्यासमोर ठेवून रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधांची कामे होणे देखील तितकेच गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक पायाभूत सुविधांची उभारणी केली जात आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर पुणे रिंग रोड हे त्याचे एक उत्तम उदाहरण सांगता येईल व त्यासोबतच पुणे शहरामध्ये मेट्रोचे जाळे देखील विस्तारण्यात येत आहे.
या माध्यमातूनच आता पुण्याचा होत असलेला भौगोलिक विस्तार डोळ्यासमोर ठेवून शहरातील रस्त्यांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आता क्रेडिट नोटवर रस्त्याचा विकास करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. या माध्यमातून जाता पुण्यातील काही रस्त्यांचा विकास केला जाणार आहे.
या रस्त्यांचा होणार विकास
पुणे महापालिकेमध्ये आता काही गावांचा समावेश करण्यात आल्यामुळे पुणे शहराची आता भौगोलिक हद्दीत वाढ झाली आहे. परंतु पुण्याचा भौगोलिक हद्द वाढीच्या तुलनेमध्ये मात्र पुणे शहरातील रस्त्यांचा विकास रखडलेला आहे. त्यामुळे आता पुणे महापालिकेने क्रेडिट नोटवर रस्त्यांचा विकास करण्याचे धोरण स्वीकारले असून पुणे शहराची जुनी हद्द आणि नव्याने महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांचा विकास आराखडा याकरिता तयार करण्यात आला आहे.
या आराखड्यामध्ये आता शहरातील अनेक रस्त्यांची कामे प्रस्तावित करण्यात आली असून रस्त्यांची हद्द आखणी करण्यासोबतच विकास आराखड्यातील रस्त्यांचे मार्किंग देखील करण्याचे काम सुरू आहे. मात्र विकास आराखड्यामध्ये ज्या रस्त्यांचे विकसन करण्यात येणार आहे त्याकरिता आर्थिक तरतूद होत नसल्यामुळे आता पीपीपी म्हणजेच सार्वजनिक खाजगी लोकसभागातून रस्त्याचा विकास करण्यात येत आहे.
यामध्ये प्रामुख्याने मुंडवा, बाणेर तसेच बालेवाडी आणि महंमदवाडी येथील रस्त्यांचं विकसन करण्यात येणार असून पाच हजार कोटी रुपयांची ही कामे आहेत. यामध्ये मुंडवा रेल्वे परिसरातील 64 ते 68 या सर्वेक्षण क्रमांक आणि ७१ या सर्वेक्षण क्रमांकातून जाणाऱ्या बारा मीटर रुंदीचा जो काही रस्ता आहे त्याच्या विकासासाठी निविदा काढण्यात आली असून त्याकरिता 53 कोटी 90 लाख रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे
दुसरे म्हणजे महंमदवाडी येथील सर्वेक्षण क्रमांक एक ते चार आणि 96, 59, 58 आणि 57 मधील 24 मीटर रुंदीचा रस्ता देखील विकसित केला जाणार आहे. तसेच रामटेकडी एमआयडीसी वसाहतीतील सर्वेक्षण क्रमांक 40 ते 76 येथील 30 मीटर रुंदीचा आणि लगतच्या 18 मीटर रुंदीचे रस्ते देखील विकसित केले जाणार असून त्याकरिता 64 कोटी 12 लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
तसेच सर्वेक्षण क्रमांक 12,12,30 आणि 32 मधून जाणाऱ्या अनुक्रमे 18 आणि 24 मीटर रुंदीचा रस्त्या करिता 14 कोटी 60 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. या व्यतिरिक्त पुण्यातील खराडी परिसरातील आठ तसेच बाणेर भागातील तीन आणि कोंढवा या ठिकाणच्या एका रस्त्याचे काम देखील हाती घेण्यात आले आहे.