Maharashtra News : महानगरी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली तसेच शेजारील रायगड आणि पालघर जिल्ह्यास सोमवारी दुपारी वादळी वारे आणि अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला.
मुंबईतील या मोसमामधील हा पहिलाच जोरदार अवकाळी पाऊस. या पहिल्याच पावसाने येथील रेल्वे, मेट्रो, विमान आणि रस्ते वाहतुकीला फटका बसला. अनेक ठिकाणी पडझड झाली, घरांवरचे पत्रे उडाले.
मुंबई परिसरात सोमवारी नेहमीप्रमाणेच कडक ऊन होते. नागरिक उष्याने हैराण होते. दुपारनंतर वातावरण अचानक बदलले. आभाळ भरून आले. प्रकाश कमी झाला. पाहता पाहता जोरदार वारे सुटले. या वादळी वाऱ्यामुळे सर्वत्र धूळ पसरली. बराच काळ असे वातावरण होते.
अशात अचानक पावसास सुरुवात झाली. यामुळे रस्ते वाहतूक मंदावली. मुलुंड, कांजूरमार्ग, जोगेश्वरी, पूर्व द्रुतगती मार्ग आदी ठिकाणी झाडे कोसळल्यामुळे वाहतुकीत अडथळे येऊन कोंडी झाली. रेल्वे रुळावर झाडे पडल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. लालबाग येथे वाहनांचा अपघात झाल्याने वाहतूक ठप्प झाली.
मुलुंड, विक्रोळी येथे वादळी वाऱ्यासह पावसाने सुरुवात केली. मुलुंडमध्ये जोरदार पाऊस कोसळला. वादळी वाऱ्यासह पावसाच्या तडाख्याने अनेकांनी घर गाठण्यासाठी रेल्वे स्थानकावर कूच केली. मात्र रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.
धुळीच्या वादळामुळे काही ठिकाणी दृश्यमानता कमालीची कमी झाल्याचे चित्र होते. याचा फटका विमानसेवेला बसला.
रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने बेस्ट बसेसकडे लोकांनी धाव घेतली. मात्र रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्याने बसेसही उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. घाटकोपर येथे रमाबाई नगर येथे होर्डिंग कोसळल्याने पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.
तर रस्ते निसरडे झाल्याने व इतर वाहतूकही धिम्या गतीने सुरू असल्याने शहरातील इतर मार्गांवरही मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यात काही ठिकाणी बेस्ट बसेस अडकून पडल्या होत्या.
बहुतेक बस गाड्यांना वायपर नसल्याने कंत्राटदारांच्या बस चालकांची भंबेरी उडाली. पावसात रस्ते निसरडे झाल्याने व अनेक बस चालकांना अनुभव नसल्याने वायपरविना बस चालवण्यास त्यांनी नकार दिला.
त्यामुळे बस चालवा, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी ताकीद आगार अधिकाऱ्यांना द्यावी लागली. बॅकबे, वरळी, शिवाजी नगर आगारात ही परिस्थिती उद्भवली होती. रात्री उशिरापर्यंत बससेवा कोलमडलेलीच होती.