प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत डिसेंबर 2023 पर्यंत लाभार्थ्यांना मोफत धान्य वितरित करण्यात येणार आहे. मात्र, या मोफत धान्य वितरणावर रेशन दुकानदारांना कमिशन किती व कधी मिळणार, हे अद्याप स्पष्ट नाही, त्यामुळे रेशन दुकानदार संभ्रमात आहेत. तसेच दुकानदारांचे दुकान भाडे, वीजबिल, मापाडी कर्मचाऱ्यांचा पगार व इतर दैनंदिन खर्च भागविताना दुकानदारांच्या नाकीनऊ येत आहेत.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जानेवारी 2023 पासून रेशन कार्डवरील सर्व लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटपाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली असुन, यानुसार आता रेशन कार्डधारकांना दरमहा 35 किलो धान्य मोफत दिले जात आहे.
गोरगरिबांना 35 किलो मोफत धान्य
केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना 35 किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी 2023 पासून डिसेंबर 2023 पर्यंत हे धान्य मोफत वाटण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सुमारे 30 लाख लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.
कमिशन नाही, तर पोट कसे भरणार?
रेशन दुकानदारांना धान्य वितरण केल्यानंतर प्रतिक्विंटलनुसार कमिशन मिळते. मात्र, आता मोफत धान्य वितरित करण्यात येणार असल्याने सरकारकडून हे कमिशन दुकानदारांना अदा करण्यात येणार आहे. मात्र, हे कमिशन कधी व किती वितरित केले जाणार, याबाबत स्पष्टता नाही.
तसेच अनेकांची दुकाने भाडोत्री जागेत आहेत. त्यामुळे जागेचे भाडे, वीजबिल, मापाडी कर्मचाऱ्यांचा पगार कसा भागवायचा आणि स्वतःसाठी पैशांची व्यवस्था कशी करायची, असा मोठा प्रश्न अनेक दुकानदारांसमोर उभा राहिला आहे.
जिल्ह्यात 1882 रेशन दुकाने
अहमदनगर जिल्ह्यात 1882 रेशन दुकाने आहेत. यातील काही दुकाने बचत गटांमार्फत चालविण्यात येत आहेत. तर काही दुकाने सहकारी संस्थांमार्फत चालविण्यात येत आहेत. काही दुकाने खासगी व्यक्ती चालवीत आहेत. यातील सहकारी संस्थांना दुकाने चालविताना फारशा अडचणी नाहीत. मात्र, बचत गट व वैयक्तिक पातळीवर दुकान चालविणाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
रेशन दुकानदारांना किती कमिशन?
रेशन दुकानदारांनी लाभार्थ्यांना धान्य वितरित केल्यानंतर एका क्विंटलमागे दुकानदारांना अवघे 150 रुपवे मिळतात. मात्र, सध्या मोफत धान्य वाटप करायचे असल्यामुळे विक्रीनंतर मिळणारे कमिशन दुकानदारांना मिळणार नाही. हे कमिशन सरकारकडून देण्यात येणार आहे. मात्र, यातही स्पष्टता नाही.
मे 2021 मध्ये सरकारने मोफत धान्य वाटपाचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सरकारने कमिशन देऊ, असे सांगितले होते. मात्र, अद्याप हे कमिशन मिळालेले नाही. आता नोव्हेंबर, डिसेंबरमधील धान्य उचलीसाठी दुकानदारांनी पैसे भरून धान्य उचलले आहे. आता हे धान्य मोफत वाढण्यात येत आहे. त्यामुळे या महिन्यांच्या पैशांचे, कमिशनचे काय , असा प्रश्न दुकानदारांसमोर आहे. – देवीदास देसाई, जिल्हाध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना