Maharashtra News:सोलापूर जिल्ह्यातील ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. यासंबंधीचे निर्देश शिक्षण आयुक्तांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती आहे.
डिसेल गुरूजी यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर ही चक्रे फिरल्याचे सांगण्यात येते.डिसले गुरूजी यांनी ३४ महिने कामावर गैरहजर राहूनही पगार घेत असल्याचे कारण देत सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी डिसले यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला.
त्यामुळे डिसले यांनी थेट राजीनामाच पाठवून दिला होता. मधल्या काळात त्यांनी शिंदे व फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी डिसले यांच्या बाबतीत काहीही चुकीचे होऊ देणार नाही, असे म्हटले होते.त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून चक्रे फिरल्याचे सांगण्यात येते.
एवढेच नव्हे तर या प्रकरणी माध्यमांमध्ये अथवा बाहेर कोठेही काहीही वाच्यता न करण्याच्या लेखी सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे आता नव्या सरकारकडून डिसले यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता त्यांच्याविरूद्ध सुरू केलेल्या पगार वसुलीचे काय होणाऱ? त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार का? याकडे लक्ष लागले आहे.