Satara News : पुसेसावळी, ता. खटाव येथील दोन युवकांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने त्याचा भडका दंगलीत उमटला. रविवारी रात्री सुमारे १०० ते १५० हून अधिक जणांच्या संतप्त जमावाने मुस्लिमांच्या दुकानांची, दुचाकी, चारचाकींची जाळपोळ केली.
तसेच मशिदीत घुसून तिची तोडफोड करण्यासह अनेकांना मारहाण केली. त्यात एका युवकाचा मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले. या दंगलीमुळे जिल्ह्यात तणाव निर्माण झाला.
दरम्यान, दंगलीचे परिणाम वाढू नयेत, यासाठी प्रशासनाने जिल्ह्याची दोन दिवस इंटरनेट सुविधा बंद ठेवली. या दंगलीत मशिदीचा केअर टेकर नूरहसन लियाकत शिकलगार (३०) याचा मृत्यू झाला.
तर जखमी युवकांवर कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत सर्फराज इलाही बागवान याने औंध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार १०० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
त्यापैकी पोलिसांनी २३ जणांना अटक केली आहे. त्यांना सोमवारी न्यायालयासमोर उभे केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,
रविवारी रात्री उशिरा पुसेसावळी येथे दंगल उफाळून आली. यावेळी मशिदीमधील वीजपुरवठा खंडित करून जोरदार मारहाण करण्यात आली. त्यामध्ये अनेक जण जखमी झाले. त्यातील एका युवकाचा मृत्यू झाला.
संतप्त जमावाने अनेकांच्या दुकानांची तसेच वाहनांची जाळपोळ केली. त्याची माहिती सर्वत्र पसरू लागल्याने तणावाचे वातावरण पसरले. मृतदेह पुसेसावळी येथे नेण्यात आल्यानंतरही आरोपींना अटक करण्याची संतप्त भूमिका घेतल्यामुळे रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे.