कुठल्याही देशाच्या आणि राज्यांच्या विकासाकरिता वाहतुकीच्या सोयी सुविधा मुबलक प्रमाणात आणि प्रगत असणे खूप गरजेचे असते. त्यामध्ये अनेक रस्तेमार्ग तसेच रेल्वे प्रकल्प यांचा आपल्याला समावेश करता येईल. भारताच्या दृष्टिकोनातून पाहिले तर भारतामध्ये अनेक मोठमोठे रस्त्याचे प्रकल्प हाती घेण्यात आले असून त्यामुळे भारतातील अनेक राज्यातील आणि देशाच्या मोठ्या शहरातील अंतर हे खूपच कमी होणार आहे.
अगदी याच दृष्टिकोनातून महाराष्ट्रात देखील अनेक रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले असून उदाहरणच घ्यायचे झाले तर नुकताच नागपूर ते नासिक भरविर इथपर्यंत सुरू झालेला समृद्धी महामार्ग याचा उल्लेख करता येईल. यासोबतच महाराष्ट्र मध्ये अनेक मोठी महामार्ग प्रस्तावित असून यामुळे महाराष्ट्रातील अनेक मोठी शहरे आणि महाराष्ट्र आणि इतर राज्य देखील जोडण्यात येणार आहेत.
अगदी याच दृष्टिकोनातून नागपूर आणि गोवा या दोन ठिकाणांना जोडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडेल असा शक्तीपीठ एक्सप्रेस वे हा खूप महत्वपूर्ण असून याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे. हा महामार्ग खूप वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यासाठी याचे महत्त्व अनन्यसाधारण असणार आहे.
शक्तीपीठ एक्सप्रेसवे गोवा आणि महाराष्ट्रासाठी ठरेल महत्त्वाचा
महाराष्ट्रातील नागपूर आणि गोवा ठिकाणांना जोडणारा शक्तीपीठ एक्सप्रेस वे ची घोषणा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आली असून हा एक्सप्रेस वे पूर्णत्वास आल्यानंतर नागपूर आणि गोवा या ठिकाणाचा प्रवास याकरिता 21 तासांच्या कालावधी हा आठ तासांवर येणार आहे. महाराष्ट्रातून हा एक्सप्रेस वे विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातून जात असल्यामुळे हा संपूर्ण परिसर एकमेकांना जोडला जाणार आहे.
भारतातील हा सर्वात लांब द्रुतगती मार्ग असणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत देखील शक्तीपीठ एक्सप्रेसवेवर चर्चा करण्यात आली होती व त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या एक्सप्रेसवे प्रकल्पाची घोषणा केली होती.
शक्तीपीठ एक्सप्रेसवे नावामागील महत्त्वाचे कारण
या महामार्गामुळे वर्ध्यातील पवनार ते गोव्यातील पत्रादेवी या महत्त्वाच्या शक्तिपीठांना उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार असून याशिवाय तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई तसेच माहूर येथील रेणुका माता इत्यादी शक्तीपीठे व अंबाजोगाई, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ तसेच नांदेड येथील गुरुद्वारा सचखंड श्री हजूर साहिब प्रधानपुर या ठिकाणाचे विठ्ठल कुमारी यासारखे पर्यटन स्थळे या एक्सप्रेस मुळे एकमेकांना जोडले जाणार आहेत व यामुळेच या मार्गाला शक्तिपीठ महामार्गाचे नाव देण्यात आलेले आहे.
याशिवाय सेवाग्राम, कारंजा लाड, माहूर तसेच औंढा नागनाथ, तख्त सचखंड गुरुद्वारा नांदेड, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, लातूर, उस्मानाबाद तसेच कोल्हापूर येथील अंबाबाई, बाळूमामा यांचे आदमापुर तीर्थक्षेत्र, कुणकेश्वर पत्रा देवी इत्यादी महत्त्वाचे स्थळे यामुळे जोडले जाणार आहेत.
कसा असणार आहे शक्तीपीठ एक्सप्रेसवे?
शक्तीपीठ एक्सप्रेसवे हा ७६० किलोमीटर लांबीचा असून सहा लेनचा द्रूतगती महामार्ग आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 75 हजार कोटी रुपये असून हा 11 जिल्ह्यांमधून जाणार आहे. अकरा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि उत्तर गोव्यातील पत्रादेवी इत्यादी महत्त्वाचे जिल्हे जोडले जाणार आहेत.
हा एक्सप्रेस पूर्ण झाल्यानंतर नागपूर ते गोवा दरम्यानचा प्रवास तब्बल 13 तासांनी कमी होणार असून तो आठ तासात पूर्ण करता येणार आहे. हा महामार्ग तयार होण्याची तारीख अद्याप निश्चित नसली तरी 2028 ते 2029 पर्यंत हा वाहतुकीसाठी खूला होण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रातील पूर्व आणि पश्चिम आणि दक्षिणेकडील तीन शक्तीपीठे, दोन ज्योतिर्लिंगे आणि काही तीर्थक्षेत्र जोडले जाणार आहेत. व्यापार व आयात निर्यात वाढीस देखील याची मदत होणार असून धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांना वगळून गोव्याकडे जाण्यासाठी हा एक उत्तम पर्याय मार्ग असेल. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा ग्रीन कॉरिडॉर प्रकल्प असल्यामुळे हजारोच्या संख्येमध्ये या महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार आहेत.