अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड मंगळवारी होत आहे. अध्यक्षपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या राजश्री घुले रिंगणात आहेत.
उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे प्रताप शेळके यांचे नाव निश्चित झाले आहे. भाजपने निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. सोमवारी झालेल्या भाजपच्या बैठकीतही निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले, मात्र पक्षाचा उमेदवार कोण हे निश्चित झालेले नाही.
दरम्यान, विद्यमान अध्यक्ष शालिनी विखे यांनी आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे भाजपचा उमेदवार कोण याकडे लक्ष लागले आहे. जि. प. पदाधिकारी निवडीसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व क्रांतिकारी शेतकरी पक्ष एकत्रित आले आहेत.
महाविकास आघाडीने अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले यांचे नाव निश्चित केले आहे. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे प्रताप शेळके यांचे नाव निश्चित झाले आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून विखे गटात अर्थात भाजपमध्ये सन्नाटा होता.
मात्र, शनिवारी भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी भाजप अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्यामुळे निवडणुकीची रंगत वाढली.
सोमवारी माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात भाजपची बैठक झाली. आमदार विखे, मोनिका राजळे, बबनराव पाचपुते, राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यावेळी उपस्थित होते.
भाजप ही निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मात्र, पक्षाचा उमेदवार कोण हे मात्र स्पष्ट न केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.