नगर :- शहर बससेवेची वर्षभरापासून असलेली प्रतीक्षा शनिवारी (६ जुलै) संपणार आहे. दीपाली ट्रान्स्पोर्ट या संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या ‘शिवनगरी’ बसगाड्या शहरातील रस्त्यांवर धावणार आहेत.
सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर या सेवेला सुरुवात होणार आहे. शहरात वर्षभरापासून नगर शहर बससेवा उपलब्ध नसल्याने नगरकरांची गैरसोय झाली. शहरातील नागरिकांना खासगी अवैध वाहतुकीतून प्रवास करण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही.
शहर बससेवेच्या तुलनेत चढ्या दराने आकारणी केली जात असल्याने शालेय विद्यार्थी, तसेच नागरिक त्रस्त झाले होते. यापूर्वीची बससेवा बंद पडल्यानंतर मनपाने नव्याने शहर बससेवा सुरू करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. त्यात दीपाली ट्रान्स्पोर्ट अभिकर्ता संस्थेने दिलेली निविदा मान्य करण्यात आली.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत निविदेला मंजुरी देतानाच नवीन बसगाड्या असाव्यात अशी अट घालण्यात आली होती. त्यानुसार अभिकर्ता संस्थेने नवीन दहा बसगाड्या आणल्या आहेत. पहिल्या टप्प्यात या बसगाड्यांमार्फत शहर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.