अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- मी सरळ मनाचा राजकारणी असून, पक्ष चौकट मानणारा आहे. मी बॅंकेच्या निवडणुकीत गाफील राहिलो. हे मान्य आहे पण एकीकडे चर्चेत गुंतून ठेवत दुसरीकडे उमेदवार पळवापळवीचे षड्यंत्र रचण्यात आले.
माझ्या पराभवाला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले जबाबदार आहेत. यांच्यामुळे माझा पराभव झाला,’ असा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.
‘हे त्यांचेच षड्यंत्र आहे,’ असेही ते म्हणाले. जिल्हा बँकेतील पराभवानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी आज सातारा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला.
आपली भूमिका जाहीर केली, यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली. एकाच दिवसात सगळे अर्ज निघाले आणि हे बिनविरोध कसे झाले हे शोधले पाहिजे, असे शिंदे म्हणाले.
आमदार शिंदे म्हणाले, ‘शिवेंद्रसिंहराजेंविषयी पक्षाने भूमिका जाहीर करावी, मी सरळपणाने निवडणूक लढवली, कोणतीही दादागिरी केली नाही. सातारा विधानसभा लढविणार का, या प्रश्नावर मी सध्या विधान परिषदेवर आहे.
त्यामुळे या जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादीचे 9 आमदार कसे होतील यासाठी प्रयत्न करणार आहे. येत्या काळात होणाऱ्या निवडणुकीत पक्षाचा बालेकिल्ला अभेद्य राहावा यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निर्णय घ्यावा’.
‘जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जे राजकारण झाले ते यापुढील निवडणुकीत होऊ नये, याची काळजी घेतली जावी. जे लोक विरोधात काम करतात ते सहकार पॅनेलमध्ये कसे आणि तेच बिनविरोध झाले.
पण आम्ही प्रामाणिक काम करूनही ताकत असूनही पराभूत होतो. यामागे पक्षातील नेत्यांचे षड्यंत्र आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.