समाजात अनेक विघातक गोष्टी घडताना दिसत आहेत. नीतिमत्ता, मूल्य यांना पायदळी तुडवले जात असल्याचे अनेक घटनांवरून दिसते. आता वारकरी क्षेत्राला कलंक लावण्याचे काम एका वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्था चालकाकडून झाले आहे. या संस्था चालकाने तीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केला आहे. धक्कादायक म्हणजे ही गोष्ट देवाच्या आळंदीत घडली आहे.
दासोपंत उंडाळकर वय- ५२ असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मागील पंधरा दिवसांपासून हा आरोपी या मुलांवर अत्याचार करत असल्याचा प्रकार उजेडात आलाय. मुलांनी हा प्रकार घरी सांगितल्यानंतर याला वाचा फुटल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली आहे.
अधिक माहितीनुसार : दासोपंत हा आळंदीत वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्थेचा संस्थाचालक तर होताच पण तो शिक्षक म्हणून जास्त वावरत असे. त्याने आपल्याच षिक्षणार्थी विद्यार्थ्यांना वासनेचा बळी पाडले. त्याच्या संस्थेत ७० मुले वारकरी शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली आहे. यातीलच तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना तो मागील १५ दिवसांपासून एकांतात बोलावून अनैसर्गिक अत्याचार करत होता.
पीडित मुलांनी त्यांच्या पालकांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहता आळंदी पोलिसांनी आरोपी दासोपंत उंडाळकर याला अटक करत पुढील करावफै सुरु केली आहे. पोलीस संस्थेतील इतर मुलांची देखील विचारपूस करणार असल्याची माहिती मिळाली आहे.