श्रीगोंदा :- राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या स्वगृही श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार सुजय विखे यांना मताधिक्य मिळाले. यामुळे श्रीगोंद्यात भाजपची ताकद आणखीच वाढली आहे.
अनपेक्षितपणे श्रीगोंदा तालुक्यातून डॉ. सुजय विखे यांना सुमारे 32 हजारांचे मताधिक्य मिळाल्याने भाजप समर्थकांना गगन ठेंगणे झाले आहे.
चार महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर या निकालाचा काय परिणाम होणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
श्रीगोंद्यात कुणाला मताधिक्य मिळणार?, यावर उत्सुकता होती, अशा परिस्थितीत विखेंना सुमारे ३१ हजार मतांचे मताधिक्य श्रीगोंद्यातून मिळाले.
विखेंसाठी बबनराव पाचपुते, भगवानराव पाचपुते, अण्णासाहेब शेलार, सदाशिव पाचपुते, दत्तात्रय पानसरे, अनिल पाचपुते, प्रा. तुकाराम दरेकर, बाळासाहेब नाहाटा, सुभाष डांगे, पुरूषोत्तम लगड, बाळासाहेब गिरमकर, महेंद्र वाखारे यांनी चांगले टीमवर्क केले. त्यातून विखेंना मताधिक्य मिळाले.
आमदार राहुल जगताप, कॉंग्रेस नेते राजेंद्र नागवडे यांचा एकत्रित प्रचार केला. त्यांना शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या घनश्याम शेलार यांनी साथ व स्थानिक उमेदवार, असे असताना देखील आ. संग्राम जगताप यांना पिछाडीवर का जावे लागले? याचे आत्मचिंतन कॉंग्रेस -राष्ट्रवादीला करावे लागेल.
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपचे पाचपुते तेरा हजार मतांनी मागे होते. सध्या विखे व भाजपच्या अभूतपूर्व यशाने भाजप-सेनेचे बळ तालुक्यात वाढणार, असे दिसते. ‘
अनुराधा नागवडे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत देऊन आमदार जगताप यांच्या पुढे नवे संकट उभे केले आहे. आगामी काही महिने श्रीगोंद्याचा राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याची चिन्हे आहेत.
भाजप समर्थकांना या विजयाने प्राणवायू मिळाला आहे, तर विरोधी गटाला एकप्रकारे धोक्याचा इशारा पण आहे. निवडणुकीच्या शेवटी तर विखे यांच्या प्रचार यंत्रणेतील प्रमुख कार्यकर्ते निवडणूक आयोगाच्या नोटिशीमुळे येथून निघून गेले होते.
स्थानिक कायकर्ते व त्यांना दिली जाणारी रसद शेवटच्या क्षणी विखे देऊ शकले नाहीत. विरोधी नेत्यांचे ऐक्य, त्याला बारामतीमधून मिळणारी रसद व मार्गदर्शन या उपरही तालुक्यातून विखे व पाचपुते यांनी एकछत्री अंमल दाखवीत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले, हे वास्तव नाकारता येणार नाही.