महाराष्ट्र

दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान

Maharashtra News : राज्यातील सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

ही योजना ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२४ या एक महिन्याच्या कालावधीत राबवण्यात येईल. यासाठी सुमारे २३० कोटी रुपये इतके अनुदान देण्यात येईल.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. राज्याच्या दूध दराच्या प्रश्नांसंदर्भात नागपुरात नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती.

त्यानंतर दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यासंदर्भातील घोषणा विधिमंडळात निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार कॅबिनेटमध्ये यावर चर्चा करून या योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेच्या अंमलबजावणीकरिता बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे अनुदान दूध उत्पादक शेतकरी यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे देण्याबाबत मान्यता देण्यात आली.

सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांमार्फत दूध उत्पादक शेतकरी यांना ३.५ फॅट/८.५ एसएनएफ या गुणप्रतिकरिता किमान २७ रुपये प्रतिलिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाइन देणे बंधनकारक राहील.

त्यानंतरच शेतकऱ्यांना शासनामार्फत प्रतिलिटर ५ रुपये अनुदान बँक खात्यावर थेट ‘डीबीटी’द्वारे देण्यात येतील. फॅट व एसएनएफ ३.५/८.५ या गुणप्रतिपेक्षा प्रति पॉइंट कमी होणाऱ्या फॅट व एसएनएफकरिता प्रत्येकी ३० पैसे वजावट करण्यात येईल. तसेच प्रति पॉइंट वाढीकरिता ३० पैसे वाढ करण्यात येईल.

राज्यात सध्या दररोज दीड कोटी लिटरच्या आसपास दुधाचे संकलन होते. यात खासगी दूध संघ व कंपन्या यांचा वाटा १ कोटींहून अधिक लिटर, तर सहकारी दूध संघांचा वाटा हा ४० ते ४५ लाख लिटरच्या दरम्यान आहे. राज्य शासनाला अनुदानापोटी २३० कोटी रुपये खर्च येईल.

हा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा विजय अजित नवले

दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय म्हणजे किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलेल्या प्रदीर्घ आंदोलनाचा हा विजय आहे. यावर आम्ही पूर्ण समाधानी नाही. कारण सरकारने पूर्वी घेतलेल्या निर्णयात बदल करून ३.२/८.३ गुणवत्तेच्या दुधाला ३४ रुपये भावाऐवजी आता ३.५/८.५ गुणवत्तेच्या दुधाला ३२ रुपये भाव जाहीर केला. मागील भावाच्या तुलनेत शेतकऱ्यांना यामुळे तोटा सहन करावा लागणार आहे. पण फॅट / एसएनएफनुसार प्रति पॉइंट ३० पैसे दर कमी अथवा वाढवण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे, असे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts