Sujay Vikhe Patil : अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील रात्री मुंबईत ज्येष्ठ नागरिकांच्या एका गाडीला धक्का मारताना दिसले. यामुळे त्यांची सध्या चर्चा सुरू आहे. अनेकदा लोकप्रतिनिधी आपल्या मतदार संघात इतरांना मदत करताना दिसतात. मात्र मुंबई कोण कोणाला विचारत नाही अशा ठिकाणी ही मदत म्हणजे खूप काही सांगून जाते.
कल्याणमधील एका अभियंत्याने ही दृष्य टिपून सोशल मीडियात पोस्ट केले आहे. याबाबत केतन भोई यांनी फेसबुकवर म्हटले आहे की, आज ऑफिस संपल्यानंतर कॅबने घरी जात असताना अंधेरी येथे ३ लोकं एका गाडीला धक्का देताना दिसले.
मुंबईत असे प्रसंग फार कमी वेळा दिसतात त्यामुळे कुतूहलाने बघत होतो. तेवढ्यात लक्षात आलं की अरे यात मध्यभागी तर आपले नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आहेत. पटकन फोटो काढायचा प्रयत्न केला पण नीट फोटो घेता आला नाही.
कुठलाही बडेजाव न करता नगरच्या बाहेर स्वतः रस्त्यावर उतरून एका अनोळखी व्यक्तीला मदत करणारे आमच्या नगरचे खासदार आहेत हे बघून अभिमान वाटला. असे खासदार सर्वांना मिळो!! असे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, खासदार डॉ. विखे पाटील काल दिल्लीला जाण्यासाठी मुंबईत विमानतळावर निघाले होते.
रस्त्यात एका ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याची गाडी बंद पडली होती. रात्रीची वेळ असल्याने मदतीला कोणीही नव्हते. ते दोघेच प्रयत्न करीत होते. हे पाहून खासदार डॉ. विखे पाटील यांनी आपले वाहन थांबविले. ते स्वत: खाली उतरले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या गाडीला धक्का मारून त्यांची मदत केली. याचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.