त्या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करा : आ. मोनिकाताई राजळे

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- पाथर्डी तालुक्याच्या परिसरात बिबट्याने उच्छाद मांडला आहे. मढी शिरापूर परिसरात या बिबट्याच्या हल्ल्यात एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण व संतापाची भावना देखील आहे, असे नमूद करीत ‘साहेब, नरभक्षक झालेल्या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करा’ अशी आर्त हाक आमदार मोनिकाताई राजळे यांनी प्रशासनाला घातली आहे.

पाथर्डीतील बिबट्याच्या हल्ल्यात प्रकरणी आ. राजळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची काल शिष्टमंडळासमवेत भेट घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. पाथर्डी तालुक्यातील मढी नजीकच्या शिरपूर शिवारात गुरुवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात एका बालकाचा मृत्यू झाला.

घरापासून दोन किलोमीटर अंतरावर या बालकाचा मृतदेह काल शुक्रवारी सकाळी आढळून आला. बिबट्याच्या या हल्ल्याप्रकरणी परिसरातील नागरिक भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. या अनुषंगाने आमदार मोनिकाताई राजळे यांनी काल दुपारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची शिष्टमंडळाच्या समवेत भेट घेतली.

या घटनेसंदर्भात आमदार राजळे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील दिले. तालुक्यातील मढी, कासार पिंपळगाव, शिरपूर,केळवंडी, बुधवंत वस्ती या भागात बिबट्याने हल्ल्या करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. जवखेडे, तिसगाव, मायंबा डोंगर, कासार पिंपळगाव, धामणगाव,

रांजणी, केळवंडी या परिसरात बिबट्याने शेतकऱ्यांच्या अनेक पाळीव प्राण्यावर हल्ला करीत पशुधनाचा जीव घेतला. हा बिबट्या नरभक्षक बनल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.बिबट्या पकडण्यासाठी अथवा त्यासंदर्भातील उपाययोजना करण्यासाठी वनविभागाची पाथर्डीतील टीम पुरेशी सक्षम नाही.

आत्तापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे नागरिकांत प्रशासन विशेषतः वन विभागाविषयी  नाराजी आणि संताप आहे. मागील काही दिवसांपासून वारंवार माणसांवर देखील आता हल्ले होऊ लागले आहे. त्यामुळे हा बिबट्या नरभक्षक झाल्याचे स्पष्ट होत आहे.

वेळीच योग्य त्या उपाययोजना करून या बिबट्याचा पुरता बंदोबस्त करावा,अशी मागणी आमदार राजळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. तसेच वस्तुस्थितीची माहिती देत बिबट्याचा बंदोबस्त त्वरित न झाल्यास  नागरिकांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल असा इशारा देखील दिला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts