Maharashtra News :शुक्रवारी रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्यावेळी जळगावमधील एका सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे समर्थक महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर हल्ला केला.
त्यांच्या घरावर पेटते सुतळी बॉम्ब आणि दगड फेकण्यात आले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. यानंतर संबंधित सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेश मूर्ती घटनास्थळावरच सोडून पळ काढला.
घटना घडली त्यावेळी महापौर जयश्री महाजन घरी नव्हत्या. नुकतीच बायपास शस्त्रक्रिया झालेले त्यांचे सासरे एकटे घरी होते. महापौर जयश्री महाजन यांच्या घराजवळून सार्वजनिक गणेश मंडळाची मिरवणूक जात होती.
त्यावेळी कार्यकर्त्यांनी महाजन यांच्या घरावर मोठ्या प्रमाणात गुलाल फेकला. काही वेळाने दगड आणि पेटते सुतळी बॉम्बसुद्धा फेकले.
त्यामुळे तेथे पोलिस आले आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. त्यामुळे सर्वजण गणपती तेथे सोडूनच पळून गेले. कारच्या काचाही फोडण्यात आल्या. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.