Maharashtra Politics : राज्यातील महाविकास आघाडीत मुस्कटदाबी होत असल्याची तक्रार घेऊन दिल्लीत गेलेल्या राज्यातील काँग्रेस नेत्यांचा दुहेरी हिरमोड झाला आहे.
एक तर दिल्लीत होणारी अशी बैठकच रद्द करण्यात आली आहे. तर दुसरीकडे खुद्द काँग्रेस नेतृत्वानेत राज्यातील काँग्रेसची मुस्कटदाबी केली आहे, त्यामुळे तक्रार तरी कशी करायची? असा प्रश्न राज्यातील काँग्रेसपुढे पडला आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिल्लीत काँग्रेसची आज बैठक होणार होती. ही संधी साधून राज्यातील नेते महाविकास आघाडीबद्दल विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल तक्रार करणार होते.
आघाडीत राहायचे की नाही, याचा निर्णयही घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यासाठी राज्यातील काही नेते दिल्लीत गेले. मात्र, ही बैठकच रद्द झाली.दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्वाने राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून कवाली गायक व प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी दिली आहे.
मुकूल वासनिक यांना राज्यातून उमेदवारी देण्याचे प्रस्तावित होते. परंतु राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी इम्रान प्रतापगढी यांच्या नावाला तेथून उमेदवारी देण्यास विरोध दर्शविल्याने वासनिक यांना राजस्थानातून उमेदवारी देण्यात आली आहे, तर प्रतापगडी यांना महाराष्ट्रात पाठविण्यात आले. यामुळे राज्यातील काँग्रेसचे नेते मात्र नाराज झाले आहेत.