महाराष्ट्र

मोठी बातमी ! राज्यातील ह्या जिल्ह्यात धबधब्यांवर बंदी सुरक्षिततेच्या कारणास्तव घेतला निर्णय

Maharashtra News : पावसाळ्यात वर्षा सहलींदरम्यान पर्यटकांच्या होणाऱ्या अनुचित घटनेची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने शहापूर तालुक्यातील धबधब्यांवर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे पर्यटन व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता आहे.

स्थानिकांचा रोजगार बुडत असल्याने योग्य खबरदारी घेऊन वर्षां पर्यटन सुरू ठेवण्याची मागणी तालुक्यातील विविध पर्यटन क्षेत्रातील नागरिकांमधून पुढे येत आहे. कसारा येथून १४ किमी अंतरावर असलेला विहिगाव अशोका धबधबा त्यापैकी एक मात्र, जिल्हा प्रशासनाने बंदी घातल्याने या फेसळत्या धबधब्याचा आनंद मिळत नसल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.

पर्यटनास वाव मिळावा, यासाठी तालुक्यात पर्यटन विकास अंतर्गत आणि काही ठिकाणी वनविभाग निधीच्या माध्यमातून धबधबे आणि धरण, तलाव, नदीक्षेत्र परिसरात कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आले.

पर्यटन विकास योजनेतून विहिगाव वनविभाग अंतर्गत अशोका धबधब्याचे सुशोभीकरण करण्यात आले. २०२० व २०२३ या दोन वर्षांत करोडो रुपये खर्च करण्यात आले. प्रवाशांची सुरक्षा आणि त्यांना सोयीसुविधा मिळाव्यात याच उद्देशाने अशोका धबधब्याचे काया पालट केले.

इतकं सर्व असतानाही बंदी घातली जाते, तर मग करोडो रुपये खर्चाचा उपयोग काय ? असा मुद्दा उपस्थित होत आहे. विहिगाव वनविभागाने जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार धबधबा प्रवेश द्वारावर बंदचे लावलेले फलक पाहून पर्यटक आपली नाराजी स्थानिकांकडे व्यक्त करून माघारी परतत आहेत.

गर्द झाडीतून २०० फूट खाली झेपावत असलेला अशोका धबधबा पर्यटकांना भुरळ घालणारा आहे. मात्र, जुलैचा पंधरवडा संपला तरी धबधब्याची भुरळ पर्यटकांना पडलीच नाही. केवळ ये-जा करण्यात पर्यटकांचा वेळ आणि पैसा खर्च होत आहे.

पर्यटकांच्या नाराजीनंतर दुसरा मुद्दा म्हणजे इथल्या आदिवासी बांधवांच्या रोजगाराचा उपस्थित होत आहे. भाजलेली कणसे, वडापाव, चहा तसेच दुपारच्या सत्रातील चुलीवरचे मांसाहारी आणि शाकाहारी जेवण, आदा रुचकर आणि स्वादिष्ट पदार्थाचा घमघमाट पर्यटन बंदीमुळे घुसमटला आहे.

एकूणच यामुळे विकएण्डला कोठे जायचे असा प्रश्न पर्यटकप्रेमींसमोर उभा राहिला आहे. स्थानिक वन व्यवस्थापन समिती व वनविभाग यांच्या माध्यमातून धबधब्यावर पोहोचण्यासाठी पर्यटकांकडून आकारण्यात येत असलेले शुल्क बुडत आहे.

शिवाय सुरक्षा रक्षक म्हणून दिले जाणारे रोजगार बुडत असल्याने स्थानिक तरुणांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. एकंदरीत दिलासादायक चार महिन्यांचा रोजगार बुडत असल्याने स्थानिक आक्षेप घेत प्रशासनाने ही बंदी मागे घ्यावी,

अशी मागणी करत आहेत. धबधबा पर्यटन बंद असल्याने नाराजीचा सुरू काढून पर्यटक मागे फिरत आहेत. त्यामुळे स्थानिकांचा रोजगार धोक्यात आला असून, कष्टातून मिळणारी पुंजी दुरावत आहे. लक्ष्मीसारख्या पावलांनी येणारे पर्यटक स्थानिकांच्या रोजगाराचा आधार आहेत. हा विचार करून प्रशासनाने ठोस उपाययोजना करून अशोका धबधबा पर्यटकांना खुला करावा.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts