अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- :- वन स्टॉप सेंटर अर्थात सखी केंद्राच्या माध्यमातून पीडित आणि अन्यायग्रस्त महिलांना न्याय देण्याचे काम चांगल्या पद्धतीने होईल, असा विश्वास राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. अर्थात, समाजाने महिलांवर अन्याय होणार नाही. त्यांना अशा केंद्रांची आवश्यकता लागणार नाही, असे वातावरण आणि मानसिकता तयार करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महिला व बालविकास विभाग केंद्र पुरस्कृत वन स्टॉप सेंटर अर्थात सखी केंद्राचा शुभारंभ पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी, जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव सुनीलजित पाटील, प्र. पोलीस अधीक्षक सागर पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मोरंबीकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे श्री. खेडकर, संचालक संतोष ठुबे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयमाला माने, स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी बालकल्याण समितीचे अध्यक्ष हनीफ शेख, आदींसह विविध मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी वन स्टॉप सेंटरची पाहणी केली. तेथील कामकाज कशा पद्धतीने चालणार याबाबत सविस्तर माहिती घेतली. श्रीमती माने यांनी त्यांना या केंद्राची माहिती दिली. हे केंद्र स्नेहालय संस्थेच्या वतीने चालविण्यात येणार आहे. या केंद्रामार्फत पीडितांना न्याय मिळण्याचे काम होईल. संकटग्रस्त महिलांना तातडीची मदत मिळण्यासाठी स्थापन केलेल्या या केंद्राचा उद्देश साध्य होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या केंद्रामार्फत कौटुंबिक हिंसाचार पीडित व लैगिंक शोषण पीडित, मानवी वाहतुकीस बळी पडलेल्या, अॅसिड हल्ल्यातील पीडित महिलेस वैद्यकीय सुविधा, पोलीस मदत केंद्र, समुपदेशन केंद्र, कायदेशीर मदत, आरोग्य सेवा व निवारा आदी सेवा देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश राऊत, शाम आसावा, संजय घुगे, अनिल गावडे, फिरोजभाई तांबटकर, राजू सिंग, प्रवीण मुत्याल, अजित माने, संजय चाबुकस्वार, अशोक अकोलकर, संध्या राशीनकर, वैभव देशमुख, प्रसाद शेळके, संध्या मेढे, अॅड. अर्जुन नेहरकर, रविंद्र काजळकर, अनिता माने, श्री. संचेती आदींची उपस्थिती होती.