Maharashtra News : घटनेत धनगर समाज्याला आरक्षणाची तरतूद असताना देखील गेल्या सत्तर वर्षापासून धनगर बांधव आरक्षणासाठी टाहो फोडत आहे. त्यामुळेच आज माझ्या धनगर बांधवाने सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळून आरक्षणाची मागणी केली आहे.
मात्र आम्ही एवढ्यावरच थांबणार नसुन जर धनगर आरक्षणाचा वटहुकुम काढला नाहीतर राज्यकर्त्यांच्या तोंडाला काळे फासू. असा इशारा यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले यांनी चौंडी येथील उपोषणस्थळी बोलताना दिला.
संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनु. जमाती (एस.टी. प्रवर्ग) आरक्षणासाठीचा वटहुकुम काढावा. या मागणीसाठी यशवंत सेनेच्यावतीने गेल्या तीन दिवसांपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथील स्मारकास्थळी गेल्या यशवंत सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आण्णासाहेब रुपनवर, सरचिटणीस सुरेश बंडगर हे उपोषणाला बसले आहेत.
बाळासाहेब दोडतले पुढे बोलताना म्हणाले की, धनगर समाज सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व आर्थिक विकासापासून वंचित ठेवण्याचे पाप सर्व पक्षाच्या राज्यकर्त्यांनी केले आहे. त्यामुळे धनगर समाज पेटून उठल्याने सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर धनगर आरक्षण कृती समितीच्या सदस्याने प्रलंबित असलेल्या धनगर आरक्षण संदर्भातील निवेदन देतावेळी भंडारा उधळून आरक्षणाची मागणी केली.
धनगर समाजाच्या कार्यकर्त्यास अमानुषपणे मारहाण केली आहे. आम्ही या मारहाणीचा यशवंत सेना व धनगर समाजाच्यावतीने निषेध करतो. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. झोपलेले सरकार कधी जागे होणार एकही प्रशासनाचा अधिकारी अजुन चौंडीकडे फिरकला नाही.
पालकमंत्री व राज्यकर्ते देखील चौंडीकडे फिरकले नाहीत. आम्ही मेलो तरी आम्ही येथुन हलणार नाही. धनगर आरक्षणाची प्रत्येक सरकारने फसवणुक केली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जे आदिवासींना आहे ते आरक्षण धनगर समाजाला देण्याचे आश्वासन दिले आहे, मात्र अजुन देखील आरक्षणाच्या बाबत धनगर समाजाच्या पदरात काहीच पडले नाही.
प्रदेशाध्यक्ष मानिकराव दांगडे पाटील, महा सचिव नितीन धायगुडे, गोविंद नरवटे, समाधान पाटील, किरण धालपे, बाळा गायके, चौंडी येथील अक्षय शिंदे, सरपंच सुनिल उबाळे हे उपोषणास्थळी लक्ष देऊन आहेत.
तसेच उपोषणास्थळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, पो.हे.कॉ संजय लोखंडे, पो. कॉ. नवनाथ शेकडे, पो.कॉ. दिपक बोराटे यांनी चौंडी येथे चोख बंदोबस्त ठेवला आहे.