महाराष्ट्र

Solar Energy : छतावरील सौरऊर्जेचे उद्दिष्ट पूर्ण ! महावितरणकडून कर्मचाऱ्यांचे अभिनंदन

Solar Energy : राज्यात वीज ग्राहकांनी छतावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या बाबतीत केंद्र सरकारने दिलेले १०० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट महावितरणने चार महिने आधी पूर्ण केले आहे.

या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी महावितरणच्या संकेतस्थळावर वीज ग्राहकांचे आणि महावितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले

छतावरील सौरऊर्जा निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून वीज ग्राहकांना चाळीस टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने महावितरणला १९ जानेवारी २०२२ रोजी ‘रुफ टॉप सोलार प्रोग्रॅम फेज २’ अंतर्गत १९ जानेवारी २०२४ पर्यंत दोन वर्षांत घरगुती ग्राहकांसाठी १०० मेगावॅटचे उद्दिष्ट दिले होते. महावितरणने हे उद्दिष्ट सोमवार, दि. २५ सप्टेंबर रोजी म्हणजे चार महिने आधीच पूर्ण केले.

राज्यात २५ सप्टेंबर रोजी रुफ टॉप सोलर वापरणाऱ्या ग्राहकांची एकूण संख्या १,०६,०९० झाली आहे व एकूण वीजनिर्मिती क्षमत १,६७५ मेगावॅट इतकी झाली आहे. राज्यात २०१६-१७ या आर्थिक वर्षात केवळ १,०७४ ग्राहकांनी छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले होते व त्यांची एकूण क्षमता २० मेगावॅट होती.

सौरऊर्जेचे अनुदान

सर्वसाधारणपणे एखाद्या कुटुंबाला ३ किलोवॅटचा सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प पुरेसा ठरतो. त्यासाठी सरकारकडून सुमारे ४३ हजार रुपये ते ५६ हजार रुपये अनुदान मिळते. हाऊसिंग सोसायट्यांना ५०० किलोवॅटपर्यंतचा प्रकल्प बसविता येतो व सार्वजनिक सुविधेसाठीच्या या प्रकल्पांना प्रतिकिलोवॅट ७२९४ रुपये अनुदान मिळते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: solar energy

Recent Posts