महाराष्ट्र

Tourism in Maharashtra : लोणावळ्यात होणार सगळ्यात भारी काचेचा स्कायवॉक !

Tourism in Maharashtra : लोणावळा येथील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथील पर्यटन विकासासाठी आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक उभारण्याबाबत पर्यटन विभागाने सविस्तर प्रकल्प आराखडा एका महिन्यात तयार करावा.

या पर्यटन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिले. पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ परिसरातील पर्यटन विकासाबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

पवार म्हणाले, लोणावळा परिसरातील निसर्गसंपदा लक्षात घेता या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटनाला चालना देण्यासाठी लहान मुलांसाठी साहसी खेळ आणि इतर सुविधांचा समावेश असलेल्या उत्तम आराखडा महिन्याभरात तयार करावा.

आराखडा तयार करताना तो निसर्गस्नेही असेल आणि पर्यावरणाला धक्का लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. आराखडा तयार करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत तातडीने नियोजन करण्यात यावे.

या परिसरात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आराखडा तयार करताना पर्यटकांची सुरक्षितता आणि पर्यावरणाच्या जपणुकीला प्राधान्य द्यावे. पर्यटकांसाठी पाऊलवाट तयार करताना कॉक्रीट ऐवजी दगडांचा वापर करावा.

पर्यटकांना सभोवतालच्या निसर्गाचा आनंद घेता येईल, अशी रचना करण्यात यावी. परिसरात वाहनतळ तसेच पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा समावेशही आराखड्यात करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

पवार यांनी २०२२ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये लोणावळा येथे पर्यटन सुविधा निर्माण करण्याबाबत घोषणा केली. होती. टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथे काचेचा स्कायवॉक उभारण्याचे प्रस्तावित आहे.

४.८४ हेक्टर परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, येथे झीप लाईनिंगसारखे साहसी खेळ, फुड पार्क, अॅम्पी थिएटर, खुले जीम आणि विविध खेळ आदी विविध सुविधा असणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या प्रकल्पासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts