महाराष्ट्र

शेतकऱ्यांचे सरकार स्थापन करण्याचा विचार ! शेतकरी संघटना बी. आर. एस. बरोबर जाणार

Maharashtra News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पश्चिम महाराष्ट्रात आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांचे सरकार स्थापन करण्याचा विचार करून कृषी क्षेत्रातील प्रभावी नेते व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांना आपल्या बाजुने वळविण्यात यश प्राप्त केलं आहे. ९ ऑगष्ट रोजी ते इस्लामपूर येथे राव यांच्या उपस्थितीत बी. आर. एस. मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी दिली आहे.

याबाबत पत्रकात अॅड. काळे यांनी म्हटले, की तेलंगणा मॉडेलचा आधार घेत देशाच्या राजकारणात पक्षाची बांधणी करण्याचा निर्णय राव यांनी घेतला आहे. त्याचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नक्कीच होईल, तेलंगण राज्याच्या निर्मितीचे शिल्पकार के चंद्रशेखर राव यांनी राज्याचा दुष्काळी भाग सुजलाम् सुफलाम् करतानाच कृषी विकासाच्या अनेक योजना राबवल्या आहेत.

देशभर प्रभाव निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने तेलंगणाच्या उत्तरेस असलेल्या महाराष्ट्राकडे विशेष लक्ष दिले आहे. मराठवाडा, पूर्व विदर्भ येथील दौरे केल्यानंतर आता त्यांनी पश्चिम महाराष्ट्राकडे लक्ष केंद्रित केले आहे. आषाढीनिमित्त जून महिन्यात त्यांनी पंढरपूर, सोलापूरची राजकीय वारी करीत या भागात पाय रोवण्याचे प्रयत्न केले आहे.

रघुनाथ दादा पाटील यांनी आपण भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करीत असल्याचे घोषणा केली आहे. पाटील यांनी ‘देश व राज्य पातळीवरील भाजपचे सरकार लुटारुंचे असून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप केला आहे. पाटील हे १६ राज्यातील कार्यरत शेतकरी संघटना ‘शिफा या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. संघटनेच्या सदस्य संघटनांना बीआरएस सोबत आणण्याचे पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास राव यांच्या मागे बळीराजाची मोठी ताकद उभी राहू शकते.

तेलंगणात बी. आर. एस. ने तब्बल ४१० योजना राबविल्या आहेत. या अंतर्गत ८५ हजार शेतकरी कुटूंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात आले आहेत. सातबाराधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास १० दिवसांत त्याच्या खात्यात ही रक्कम टाकली जाते. शेतकऱ्यास एकरी १० हजारांची मदत दिली जात आहे. राव यांनी तलाठी व्यवस्थाच संपुष्टात आणली आहे. त्यासाठी १२ हजार ७०० तलाठी दुसऱ्या खात्यात वळते केले. शेतकरी संघटना बी. आर. एस. सोबत युती करून शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र निर्माण करणार असल्याची माहिती अॅड. काळे यांनी दिली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts