मुंबई : विधानसभेच्या सभागृहात (assembly hall) भाजप (Bjp) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कोल्हापुर (Kolhapur) मधील रुग्णालयात असताना मला ठार मारण्याचा प्लॅन (Plan) चालू होता, असा गंभीर आरोप केला आहे.
शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, तब्येत अस्वस्थ असल्याने सिंधुदुर्गातून नितेश राणे यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, त्यावेळी आपल्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
सभागृहात बोलताना नितेश राणे म्हणाले, मी कोल्हापुरातील रुग्णालयात अॅडमिट असताना अचानक डॉक्टरांनी मला सीटी एन्जिओ टेस्ट करण्याची गरज असल्याचं सांगितले.
पण एका कर्मचाऱ्याने मला सांगितलं की साहेब, हे सीटी एन्जिओ करु नका. त्या निमित्ताने इंक शरीरात टाकली जाईल आणि त्यामधून तुम्हाला मारुन टाकण्याचा प्लॅन आहे. या कर्मचाऱ्याने मला आधीच सांगितल्याने मी जिवंत राहिलो, असा खळबळजनक दावा नितेश राणे यांनी केला आहे.
दरम्यान, माझ्याकडे पेन डाईव्ह आहे तो मी न्यायालयात देणार असेही आमदार नितेश राणे म्हणाले आहेत. ते म्हणाले की, माझ्याकडे पुरावा आहे, आम्ही सिद्ध करू शकतो. ८ तारखेच्या रात्री राज्यातला एक मंत्री त्या पार्टीत होता. त्याचे पुरावे आहेत ते आम्ही कोर्टात देऊ, असे नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे.