अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापासून विद्यमान अध्यक्ष शालिनी विखे यांना दूर ठेवण्याची महाविकास आघाडीने आखलेली रणनिती अखेर यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे.
या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व क्रांतिकारी शेतकरी पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीच्या माध्यमातून विद्यमान अध्यक्षा शालिनी विखे यांची कोंडी केल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने गटनेता बदलला असून, नवे गटनेते अजय फटांगरे यांनी काँग्रेसच्या सदस्यांना व्हीप बजावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी १८ सदस्यांनी नगरमध्ये बैठक घेऊन महाविकास आघाडीबरोबरच जाण्याची सूचना दिली आहे.
शिवसेनेने ही बैठक घेऊन महाविकास आघाडीबरोबरच जाण्याचा निर्णय घेतला असून, क्रांतिकारी शेतकरी पक्षही महाविकास आघाडीत सहभागी झाला आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दबाव चालणार नाही, वर सरकार आमचे आहे, असा इशारा राष्ट्रवादीचे पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी विखे यांचे नाव न घेता लगावला.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सध्या विद्यमान उपाध्यक्षा राजश्री घुले यांचे नाव आघाडीवर आहे. असे असले तरी दुसरीकडे सदस्या प्रभावती ढाकणे व अन्य दोन सदस्यांची नावे चर्चेत आहेत.
त्यामुळे पक्षाचा उमेदवार कोण असेल तसेच जिल्हा परिषदेच्या समिती सभापती पदांबाबत काही निर्णय झाला आहे का याबाबत निश्चित माहिती काकडे यांनी दिली नाही. घुले याच अध्यक्षपदासाठी उमेदवार असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.