महाराष्ट्र

दिवसेंदिवस वाढतेय कर्णर्ककश हॉर्नची समस्या ! नो हॉर्न प्लीज केवळ नावालाच

Maharashtra News : हॉनच्या आवाजाशिवाय प्रकाश ही कल्पना तरी करता येईल का ? कर्णकर्कश हॉर्नची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. असे मोठ्या आवाजाचे हॉर्न वाजविणे काद्यात बसत नसले,

तरी तरुणांच्या डोक्यात बसत असल्याने आवाजाची तीव्रता वाढतच आहे. यासाठी केवळ कायदा करून उपयोग होणार नाही, तर हॉर्नशिवाय प्रवास करण्याची सवय प्रत्येकाने लावून यासंदर्भात जनजागृती करण्याची गरज आहे.

रस्त्यावर वाहनाला आडवे आलेल्या नागरिकांना सावध करण्यासाठी हॉर्न वाजविणे अपेक्षित आहे; परंतु रस्त्यावरून वाहन चालवताना अनेक वेळा गरज नसताना हॉर्न वाजविला जातो. विशेषतः तरुणांमध्ये अशी सवय जास्त आहे.

ट्रकच्या आवाजाने तर आवाजाची अत्युच्च पातळी गाठलेली असते, इतकी की या हॉर्नच्या आवाजामुळे दचकून दुचाकीस्वार बॅलन्स जाऊन रस्त्यावर पडतात व अपघात होतो.

असे ट्रक हॉर्न वाजवत शेजारून गेल्यास वाहनधारक विचलित होऊन त्याचा गाडीवरील ताबा जाऊ शकतो. दिवसेंदिवस या कर्णकर्कश हॉर्नची समस्या गंभीर स्वरुप धारण करू लागली आहे. त्यामुळे या समस्येवर लवकरात लवकर उपाय शोधणे गरजेचे आहे.

विनाकारण हॉर्न वाजविल्यास, किंवा जिथे हॉर्न वाजवायला बंदी आहे, अशा भागात हॉर्न वाजवल्यास तसेच गाडीला प्रेशर हॉर्न बसवल्यास, किंवा विचित्र आवाजाचे हॉर्न बसवल्यास अशा वाहन मालक आणि चालकांवर दंड करण्याची तरतूद मोटार वाहन कायद्यात आहे; परंतु या नियमाची अंमलबजावणी कचितच केली जाते.

तरुणांना आवाजाचे आकर्षण असते. त्यामुळे केवळ हौस म्हणून काही तरूण विनाकारण रस्त्यावर हॉर्न वाजवत फिरत असतात. सध्या वाहनांची संख्या वाढल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रमाण वाढलेले आहे; परंतु पुढे वाहन जायला जागा नाही, हे माहिती नसतानाही अशा वाहन कोंडीत विनाकारण हॉर्न वाजविणार्‍यांची संख्याही कमी नाही. या हॉर्नचा वाहतुक पोलिसांनाही त्रास होत आहे; तरीही पोलीस विभाग हा प्रश्न गांभीर्याने घ्यायला तयार नाही.

कर्णकर्कश हॉर्नमुळे सर्वाधिक त्रास वृद्धांना होतो. विश्रांतीची गरज असलेल्या वृद्धांच्या कानांना इजा होण्याची शक्यता असते. रस्त्याने पायी चालताना अचानक मोठ्याने हॉर्न वाजल्यामुळे वृद्ध दचकतात आणि गोंधळतात. गरोदर महिला आणि रुग्णांनाही कर्णकर्कश हॉर्नचा त्रास होतो. याकडे संवेदनशील लोकांनी व प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

ध्वनीप्रदूषणाचे परिणाम

ध्वनीप्रदूषणामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग, मानसिक ताण, चिडचिडेपणश, नैराश्य, बहिरेपणा अशा त्रासांचा सामना करावा लागू शकतो. तसेच शाळा, हॉस्पिटल अशा ठिकाणी हॉर्न वाजविल्यास अनेक समस्या निर्माण होतात.

नो हॉर्न प्लीज केवळ नावालाच

शाळा, महाविद्यालये, दवाखाने, हॉस्पिटल अशा परिसरात हॉर्न वाजवू नयेत, असे नियम आहेत; परंतु भारतात तरी या नियमांचे पालन कुणी करीत नाही. त्यामुळे विद्यार्थी व रुग्णांचा याचा भयंकर त्रास सहन करावा लागतो.

नो हॉर्न डे

ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस नो हॉर्न डे राबविण्याची गरज आहे. जेणेकरून याबाबत जनजागृतीही होईल, नागरिकांचे या समस्येकडे लक्ष वेधले जाईल आणि किमान एक दिवस तरी रस्त्यावर हॉर्न वाजणार नाही.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office